टीम इंडिया टी-20 वर्ल्डकप जिंकून मायदेशी परतली आहे. भारतीय संघ मायदेशी परतल्यानंतर चाहत्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले. टीम इंडियाने २९ जून रोजी वर्ल्डकप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता, पण त्यानंतर लगेच टीम भारतात पोहोचू शकली नाही. बार्बाडोस येथील चक्रीवादळामुळे टीम इंडिया ५ दिवसांनी भारतात परतली.
देशात परतल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने मुंबईतील मरीन ड्राईव्हवर ओपन बसमध्ये विजयी परेड काढली. टीम इंडिया ४ जुलै रोजी बार्बाडोसहून भारतात परतली. या दिवशी मुंबईत विजय परेडचे आयोजन करण्यात आले होते. विजयाची परेड चाहत्यांसाठी आणि खेळाडूंची खूपच अप्रतिम ठरली, पण या परेडने मुंबईकरांना खूप त्रास दिला. प्रत्यक्षात या परेडनंतर मरीन ड्राइव्हवरून ११ हजार किलो कचरा हटवण्यात आला.
विजय परेडनंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) रात्रभर मरिन ड्राइव्हची स्वच्छता केली. बीएमसीच्या कर्मचाऱ्यांनी एका चॅनेलशी बोलताना साफसफाई करताना ११ हजार किलो कचरा सापडल्याचे सांगितले. सुमारे १०० कर्मचारी या साफसफाईत गुंतले होते. नरिमन पॉईंटपासून सुरू झालेली विजयी मिरवणूक वानखेडे स्टेडियमपर्यंत गेली.
परेड पाहण्यासाठी लाखो चाहत्यांनी गर्दी केली होती. या परेडनंतर अनेकांच्या चप्पल रस्त्यावर पडलेल्या होत्या. याशिवाय रस्त्यावर पाण्याच्या बाटल्या आढळून आल्या. या साफसफाईसाठी संपूर्ण रात्र लागली. जमा झालेला कचरा २ मोठे डंपर आणि ५ जीपमधून नेण्यात आला.
या कार्यक्रमानंतर बीएमसीने सोशल मीडियावर लिहिले की, "टीम इंडियाच्या भव्य स्वागतानंतर आणि लाखोंची गर्दी गायब झाल्यानंतर, बीएमसीने संपूर्ण मरीन ड्राइव्ह परिसरात रात्रभर विशेष स्वच्छता मोहीम राबवली. परिसराची पूर्णपणे स्वच्छता करण्यात आली आणि मरीन ड्राइव्हवर फिरायला येणाऱ्या मुंबईकरांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली."
तसेच, पुढे सांगण्यात आले की, "BMC च्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्वच्छता मोहिमेदरम्यान दोन मोठे डंपर आणि ५ छोट्या जीपमध्ये भरून अतिरिक्त कचरा गोळा केला."