तब्बल १२० वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुन्हा झाला 'हा' चमत्कार! मार्को जन्सेननं केली विश्वविक्रमाची बरोबरी
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  तब्बल १२० वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुन्हा झाला 'हा' चमत्कार! मार्को जन्सेननं केली विश्वविक्रमाची बरोबरी

तब्बल १२० वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुन्हा झाला 'हा' चमत्कार! मार्को जन्सेननं केली विश्वविक्रमाची बरोबरी

Nov 28, 2024 07:37 PM IST

Marco Jansen World Record : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को जन्सेन यानं कसोटी क्रिकेटमध्ये कमीत कमी चेंडू टाकून जास्तीत जास्त बळी घेण्याचा विश्वविक्रम केला आहे.

तब्बल १२० वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये झाला हा चमत्कार! मार्को जन्सेननं केली विश्वविक्रमाची बरोबरी
तब्बल १२० वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये झाला हा चमत्कार! मार्को जन्सेननं केली विश्वविक्रमाची बरोबरी (AFP)

Marco Jansen World Record : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को जन्सेन यानं कसोटी क्रिकेटमध्ये एका आश्चर्यकारक कामगिरीची पुनरावृत्ती केली आहे. त्यानं कमीत कमी चेंडू टाकून सर्वात वेगानं ७ बळी घेण्याच्या १२० वर्षे जुन्या विश्वविक्रमाची बरोबरी केली आहे. 

डरबन येथे श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात जन्सेननं वादळी गोलंदाजी केली. श्रीलंकेच्या संघाला जन्सेनसमोर गुडघे टेकणं भाग पडलं आणि लंकेचा संपूर्ण संघ अवघ्या ४२ धावांवर कोसळला. दक्षिण आफ्रिकेच्या संघालाही मोठी धावसंख्या उभारता आली नसली तरी त्यांना १४९ धावांची आघाडी मिळाली.

मार्को जन्सेननं ६.५ षटकांत १३ धावा देत ७ बळी घेतले. हे करताना त्यानं १९०४ मध्ये ह्यू ट्रंबुलनं केलेल्या विश्वविक्रमाची बरोबरी केली. ट्रंबुलनं इंग्लंडविरुद्धच्या कसोटी क्रिकेट सामन्यात ४१ चेंडूत म्हणजेच ६.५ षटकांत ७ विकेट्स घेतल्या होत्या. तर इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडनं २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७ षटकांत ७ विकेट घेतल्या आहेत. जन्सेननं याबाबतीत स्टुअर्ट ब्रॉडला मागे टाकलं आहे.

सामन्यात पावसाचा व्यत्यय

पावसानं व्यत्यय आणलेल्या या सामन्यात श्रीलंकेच्या संघानं यजमान दक्षिण आफ्रिकेला १९१ धावांवर गुंडाळलं. त्यानंतर श्रीलंका संघ या सामन्यात आघाडी घेईल असं वाटत होतं. मात्र, दक्षिण आफ्रिकेनं तसं होऊ दिलं नाही. श्रीलंका संघाला पहिला धक्का संघाची धावसंख्या ६ असताना बसला आणि त्यानंतर एकमागोमाग एक रांग लागली. मार्को जन्सेनचा श्रीलंकेच्या फलंदाजांना डोकंच वर काढू दिलं नाही. त्याला गेराल्ड कोएट्झी आणि कागिसो रबाडा यांनीही चांगली साथ दिली. या त्रिकुटानं श्रीलंकेच्या फलंदाजांना मैदानात टिकूच दिलं नाही. कोएट्झीनं दोन तर रबाडानं एक विकेट घेतली आणि संपूर्ण संघ १३.५ षटकांत ४२ धावांवर बाद झाला.

Whats_app_banner