आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सने आतापर्यंत दोन सामने खेळले असून दोन्ही सामने गमावले आहेत. पाचवेळचा चॅम्पियन असलेल्या मुंबईने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत तरी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केलेली नाही.
विशेष म्हणजे, मुंबईच्या खराब कामगिरीचे खापर कर्णधार हार्दिक पांड्यावर फोडले जात आहे. आयपीएलच्या दोन महिनेआधी मुंबई इंडिन्सच्या मॅनेजमेंटने रोहित शर्माच्या जागी हार्दिकला कॅप्टन बनवले. पण हा निर्णय चाहत्यांना आवडला नाही. हार्दिक कर्णधार झाल्यापासून चाहते त्याला सतत ट्रोल करत आहेत.
मुंबईने यंदाचा पहिला सामना अहमदाबादेत खेळला. त्या सामन्यात हार्दिकला प्रचंड ट्रोलिंगला सामोरो जावे लागले. चाहते संपूर्ण सामन्यात रोहित-रोहितच्या घोषणा देत होते. तसेच, चाहते हार्दिकाला शिवीगाळदेखील करत असल्याचे समोर आले होते.
त्यानंतर बुधवारी (२७ मार्च) मुंबई-हैदराबाद सामना हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यातही हार्दिकला प्रचंड ट्रोल केले गेले.
अशातच मुंबईच्या होम ग्राउंडवर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर हार्दिक पांड्या सामना खेळेल, तेव्हा चाहते काय करतील, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
वास्तविक, हार्दिक पांड्यााल कर्णधार बनवणे चाहत्यांना आवडलेले नाही. अशा परिस्थितीत त्याला वानखेडे स्टेडियमवर चाहत्यांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागू शकते, असे माजी क्रिकेट मनोज तिवारीने म्हटले आहे.
तसेच, हार्दिककडे अशा परिस्थितीत लागणारा संयम असल्याचेही तिवारीने म्हटले आहे. मुंबई इंडियन्स १ एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्सविरुद्ध घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे स्टेडियमवर सामना खेळणार आहे.
मनोज तिवारी पीटीआयशी बोलताना म्हणाला की, 'मुंबईत त्याचं स्वागत कसं होतं ते पाहावं लागेल. मला वाटतं की त्याला इथे आणखी ट्रोल केलं जाईल. कारण एक चाहता म्हणून (मुंबईचा किंवा रोहित शर्माचा चाहता म्हणून) कर्णधारपद हार्दिककडे दिले जाईल, अशी कोणालाच अपेक्षा नव्हती.
तिवारी पुढे म्हणाला, 'रोहितने मुंबई इंडियन्सला ५ ट्रॉफी दिल्या, तरीही त्याला कर्णधारपद गमवावे लागले. मला माहित नाही कारण काय आहे, परंतु मला वाटते की चाहत्यांना ते आवडले नाही... आणि तुम्ही मैदानावर प्रतिक्रिया पाहत आहात".
मात्र, हार्दिक या परिस्थितीला ज्या पद्धतीने सामोरे गेला ते पाहून तिवारी प्रभावितही झाला आहे. तो म्हणाला, की ‘मी अलीकडे जे काही दूरचित्रवाणीवरून पाहत आहे, तो खूप शांत राहिला, तो नर्व्हस झाला नाही हे चांगल्या स्वभावाचे लक्षण आहे.’