Eknath Shinde: बार्बाडोसमध्ये दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी पराभव करत भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. भारताच्या या कामगिरीबाबत संपूर्ण देशभरातून भारतीय क्रिकेट संघाचे कौतूक होत आहे. टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय संघाचे अभिनंदन केले. ही भारतीय नागरिकांसाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
एएनआयशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "भारताने विश्वचषक जिंकला ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि सूर्यकुमार हे मुंबईचे आहेत, ही देखील आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. मी संपूर्ण टीमला शुभेच्छा देतो", असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
'टी-२० विश्वचषक २०२४ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने अवघ्या ३४ धावांवर तीन विकेट्स गमावले. मात्र, त्यानंतर विराट कोहली आणि अक्षर पटेल यांनी चौथ्या विकेटसाठी ७२ धावांची भागिदारी रचत संघाची धावसंख्या पुढे नेली. अक्षर पटेल आऊट झाल्यानंतर विराट कोहलीने शिवम दुबेसह ५७ धावांची भागिदारी केली. यामुळे भारताला २० षटकात ७ विकेट्स गमावून १७६ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून केशव महाराज आणि एनरिच नॉर्टजे हे अव्वल गोलंदाज होते. मार्को जेनसेन आणि एडेन मार्करम यांनी प्रत्येकी एक- एक विकेट घेतली.
१७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अवघ्या १२ धावांवर दोन विकेट्स गमावल्या. मात्र, त्यानंतर क्विंटन डी कॉक आणि ट्रिस्टन स्टब्स यांच्यातील ५८ धावांच्या भागीदारीने दक्षिण आफ्रिकेला सामन्यात पुनरागमन केले. हेनरिक क्लासेनच्या अर्धशतकामुळे हा खेळ भारताकडून हिरावून घेण्याचा धोका निर्माण झाला. मात्र अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक यांनी डेथ ओव्हर्समध्ये दमदार पुनरागमन करत दक्षिण आफ्रिकेला १६९ धावांवर रोखले.
विराटला त्याच्या कामगिरीसाठी 'प्लेयर ऑफ द मॅच' पुरस्कार मिळाला. आता २०१३ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर प्रथमच आयसीसी विजेतेपद पटकावून भारताने आयसीसी करंडकाचा दुष्काळ संपुष्टात आणला आहे.