मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  LSG vs PBKS : लखनौच्या मयंक यादव-मोहसीन खानने बाजी पालटली, रोमहर्षक सामन्यात पंजाबचा पराभव

LSG vs PBKS : लखनौच्या मयंक यादव-मोहसीन खानने बाजी पालटली, रोमहर्षक सामन्यात पंजाबचा पराभव

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 30, 2024 11:38 PM IST

LSG vs PBKS IPL 2024 highlights : आयपीएलमध्ये आज पंजाब आणि लखनौ आमनेसामने होते. या सामन्यात लखनौने गोलंदाजांच्या बळावर २१ धावांनी विजय मिळवला.

Lucknow Super Giants won by 21 runs
Lucknow Super Giants won by 21 runs (AFP)

LSG vs PBKS IPL 2024 highlights : इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2024) शनिवारी (३० मार्च) लखनौ सुपर जायंट्स (LSG) आणि पंजाब किंग्स (PBKS) यांच्यातरोमांचक सामना खेळला गेला. लखनौच्या भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकना क्रिकेट स्टेडियमवर झालेलया या सामन्यात लखनौने २१ धावांनी विजय मिळवला. 

पंजाबचा कर्णधार शिखर धवनची ७० धावांची खेळी व्यर्थ गेली. या सामन्यात पंजाब किंग्जसमोर २०० धावांचे लक्ष्य होते, याला प्रत्युत्तर म्हणून शिखर धवनच्या नेतृत्वाखालील संघ ५ विकेट गमावून केवळ १७८ धावाच करू शकला आणि सामना गमावला. 

कर्णधार धवनने ५० चेंडूत सर्वाधिक ७० धावांची खेळी केली. तर जॉनी बेअरस्टोने २९ चेंडूत ४२ धावा केल्या. या दोघांनी १०२ धावांची सलामी दिली होती.

पण मधल्या फळीच्या फलंदाजांनी निराशा केली. वेगवान गोलंदाज मयंक यादवने ३ तर मोहसीन खानने २ बळी घेत पंजाब संघाचे कंबरडे मोडले आणि लखनौला सामना जिंकून दिला. पंजाबचे सॅम करन, प्रभसिमरन सिंग आणि जितेश शर्मा हे फलंदाज मयंक आणि मोहसीनसमोर सपशेल फेल झाले.

लखनौचा डाव

लखनौ सुपर जायंट्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ गडी गमावून १९९ धावा केल्या. यामध्ये क्विंटन डी कॉकने ५४, निकोलस पुरनने ४२ आणि कृणाल पांड्याने नाबाद ४३ धावा केल्या.

पंड्याने २२ चेंडूत नाबाद ४३ धावा केल्या. त्याने ४ चौकार आणि २ षटकार मारले. पुरनने २१ चेंडूत ३ षटकार आणि ३ चौकारांसह ४२ धावा केल्या. डी कॉकने अर्धशतक झळकावले. त्याने ३८ चेंडूत ५४ धावा केल्या.

पंजाब किंग्जकडून गोलंदाजीत सॅम करनने ३ बळी घेतले. त्याने ४ षटकात २८ धावा दिल्या. अर्शदीप सिंगने ३ षटकात ३० धावा देत २ बळी घेतले. कागिसो रबाडा आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

IPL_Entry_Point