IPL 2024: लखनौ सुपर जायंट्सला मोठा धक्का बसला असून संघाचा युवा वेगवान गोलंदाज शिवम मावी दुखापतीमुळे आयपीएल २०२४ मधून बाहेर पडला आहे. लखनौच्या संघाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली. आयपीएलच्या यंदाच्या लिलावात लखनौच्या संघाने शिवम मावीवर ६.४ कोटीची बोली लावून त्याला संघात सामील करून घेतले. मात्र, मावीच्या दुखापतीचे गांभीर्य पाहता त्याला एकही सामना न खेळता स्पर्धेतून माघार घ्यावी लागली.
लखनौने शेअर केलेल्या व्हिडिओत शिवम मावी त्याच्या दुखापतीवर चर्चा करताना दिसत आहे. "मला वाटले होते की, मी सामना खेळेन आणि माझ्या संघासाठी चांगली कामगिरी करेन, पण दुर्दैवाने दुखापतीमुळे मला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. खेळाडूला मानसिकदृष्ट्या मजबूत असणे आवश्यक आहे आणि पुनर्वसन करताना कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे, हे देखील माहिती असणे आवश्यक आहे.
लखनौ सुपर जायंट्सने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "प्रतिभावान उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज डिसेंबरमध्ये झालेल्या लिलावानंतर आमच्या संघात सामील झाला आणि प्री-सीझनपासून शिबिराचा भाग आहे. तो आमच्या संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. परंतु, दुखापतीमुळे त्याला बाहेर पडावे लागले. अम्ही आणि शिवम दोघेही निराश झालो आहोत.
भारतासाठी सहा टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या मावीला लखनौने गेल्या लिलावात ६.४ कोटी रुपयांना विकत घेतले होते. आवेश खानची पोकळी भरून काढण्यासाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला. मात्र, दुखापतीमुळे तो एकही सामना खेळू शकला नाही.
मावीच्या अनुपस्थितीचा संघावर जास्त परिणाम होणार नाही. कारण, लखनौकडे मॅट हेन्री, शमर जोसेफ आणि मोहसिन खान यांच्यासह सीम बॉलिंगचे अनेक पर्याय आहेत. सुपर जायंट्स सध्या तीन सामन्यांपैकी दोन विजयांसह गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे; त्यांनी मंगळवारी रात्री रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला पराभूत केले आणि मोसमातील सलग दुसरा विजय नोंदविला.
दिल्लीचा २१ वर्षीय वेगवान गोलंदाज मयंक यादव २०२४ च्या मोसमात सुपर जायंट्ससंघाकडून आपल्या जबरदस्त वेगामुळे धुमाकूळ घालत आहे. गेल्या आठवड्यात पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात त्याने संघासाठी पदार्पण केले आणि चार षटकांत २७ धावांत ३ विकेट घेतल्या. त्यानंतर बंगळुरूविरुद्ध सामन्यात त्याने आपला शानदार फॉर्म कायम ठेवत चार चेंडूत केवळ १४ धावा दिल्या आणि तीन महत्त्वाच्या विकेटही घेतल्या. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात त्याने ताशी १५६.७ किमी वेगाने गोलंदाजी केली.
संबंधित बातम्या