इंडियन प्रीमियर लीग २०२४ चा ११ वा सामना आज (३० मार्च) पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना खेळला गेला. लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर लखनौने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि १९९ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात पंजाबचा संघ केवळ १७८ धावा करू शकला. अशा प्रकारे लखनौने २१ धावांनी सामना जिंकला.
२०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्जकडून शिखर धवनने कर्णधारपदाला साजेशी खेळी खेळली. त्याने ५० चेंडूंचा सामना करत ७० धावा केल्या. मात्र, धवनची ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.
जॉनी बेअरस्टोने ४२ धावा केल्या. लिव्हिंगस्टोनने नाबाद २८ धावा केल्या. सॅम करन आणि अर्शदीप सिंग यांनी संघासाठी गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली. करनने ३ बळी घेतले. तर अर्शदीपने २ बळी घेतले.
लखनौच्या गोलंदाजीसमोर सॅम करनलाही चांगली कामगिरी करता आली नाही. तो मैदानात येताच मोहसीन खानने त्याला बाद केला. करन शुन्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. शशांक सिंग सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आहे. संघाला विजयासाठी १६ चेंडूत ५१ धावांची गरज आहे.
पंजाबचा कर्णधार शिखर धवनने ३० चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या आहेत. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून ५ चौकार आणि ३ षटकार आले आहेत. आठव्या षटकात त्याने रवी बिश्नोईविरुद्ध दमदार षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले.
पॉवरप्ले संपला आहे आणि पॉवरप्लेमध्ये पंजाब किंग्जने बिनबाद ७१ धावा ठोकल्या आहेत. शिखर धवनने ५ चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ४१ धावा केल्या आहेत तर जॉनी बेअरस्टो १० चेंडूत २० धावा करून खेळत आहे. दोघांमध्ये जबरदस्त भागीदारी पाहायला मिळत आहे. मोहसीन खानने पहिल्या सहा षटकांमध्ये लखनौसाठी सर्वाधिक धावा दिल्या आहेत. त्याने २ षटकांमध्ये २३ धावा दिल्या आहेत.
पंजाब किंग्जला सामना जिंकण्यासाठी २०० धावांचे लक्ष्य मिळाले आहे. लखनौ सुपर जायंट्सने २० षटकांत ८ गडी गमावून १९९ धावा केल्या आहेत. यामध्ये क्विंटन डी कॉकने ५४, निकोलस पुरनने ४२ आणि कृणाल पांड्याने नाबाद ४३ धावा केल्या.
पंड्याने २२ चेंडूत नाबाद ४३ धावा केल्या. त्याने ४ चौकार आणि २ षटकार मारले. पुरनने २१ चेंडूत ३ षटकार आणि ३ चौकारांसह ४२ धावा केल्या. डी कॉकने अर्धशतक झळकावले. त्याने ३८ चेंडूत ५४ धावा केल्या.
पंजाब किंग्जकडून गोलंदाजीत सॅम करनने ३ बळी घेतले. त्याने ४ षटकात २८ धावा दिल्या. अर्शदीप सिंगने ३ षटकात ३० धावा देत २ बळी घेतले. कागिसो रबाडा आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
लखनौचा कर्णधार निकोलस पुरन ४२ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. १६व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कागिसो रबाडाने त्याला आपला बळी बनवले. क्रुणाल पंड्या सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.
लखनौची चौथी विकेट पडली आहे. क्विंटन डी कॉक अर्धशतकानंतर बाद झाला. त्याने ३८ चेंडूंचा सामना करत ५४ धावा केल्या. डी कॉकच्या या खेळीत ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. अर्शदीप सिंगने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. पंजाबकडून अर्शदीपने दुसरी विकेट घेतली.
८व्या षटकातील चौथ्या चेंडूवर लखनौला आणखी धक्का बसला. मार्कस स्टोइनीसला राहुल चहरने बोल्ड केले. याआधीच्या दोन चेंडूंवर स्टोइनीसने दोन षटकार खेचले होते, तिसरा षटकार मारण्याचा नादात स्टोइनीस बाद झाला.
लखनौला पहिला धक्का ३५ धावांच्या स्कोअरवर बसला. चौथ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अर्शदीप सिंगने केएल राहुलला जॉनी बेअरस्टोकरवी झेलबाद केले. या सामन्यात राहुलला केवळ १५ धावा करता आल्या. अर्शदीपच्या या षटकात त्याने एक चौकार आणि एक षटकार लगावला. देवदत्त पडिक्कल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे.
लखनौ सुपर जायंट्सचा डाव सुरू झाला आहे. केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक सलामीला आले आहेत. दोघांकडून चांगली सुरुवात अपेक्षित आहे. या सामन्यात केएल राहुल कर्णधार नाही, त्याच्या जागी निकोलस पुरन संघाचे नेतृत्व करत आहे.
पंजाब किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, जितेश शर्मा (विकेटकीपर), शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग.
इम्पॅक्ट सब : प्रभसिमरन सिंग, रिली रौसो, तनय थियागराज, विद्वथ कवेरप्पा, हरप्रीत भाटिया.
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), केएल राहुल, देवदत्त पडिककल, आयुष बडोनी, निकोलस पूरन (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, क्रुणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसिन खान, मयंक यादव, मणिमरन सिद्धार्थ.
इम्पॅक्ट सब : ॲश्टन टर्नर, नवीन-उल-हक, अमित मिश्रा, दीपक हुडा, के गौथम
लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. केएल राहुलऐवजी निकोलस पुरन आज लखनौचा कर्णधार असणार आहे.
आयपीएल २०२४ मधील पंजाबचा हा तिसरा सामना असेल, त्यांनी त्यांच्या पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केले होते. तर दुसऱ्या सामन्यात त्यांचा आरसीबीकडून पराभव झाला. ते गुणतालिकेत ५व्या क्रमांकावर आहेत.
तर लखनऊ सुपर जायंट्स पॉइंट टेबलमध्ये तळाच्या म्हणजे दहाव्या स्थानावर आहे. लखनौ सुपर जायंट्सला राजस्थान रॉयल्सविरुद्ध २० धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता.