आयपीएल २०२४ चा ३४ वा सामना आज (१९ एप्रिल) लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळला गेला. लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर लखनौचा कर्णधार केएल राहुलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.
यानंतर सीएसेकने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौने १९व्या षटकात २ गड्यांच्या मोबदल्यात १८० धावा केल्या आणि सामना जिंकला.
लखनौचा हा सात सामन्यांमधला चौथा विजय आहे, तर दुसरीकडे चेन्नईचा ७ सामन्यांमधला हा तिसरा पराभव ठरला.
सीएसकेच्या १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौचा कर्णधार केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी संघाला शानदार सुरुवात करून दिली. राहुल आणि डी कॉकमध्ये १५ षटकात १३५ धावांची भागीदारी झाली. या भागीदारीने सामना पूर्णपणे लखनौच्या बाजूने वळवला.
राहुलने ५३ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांसह सर्वाधिक ८२ धावा केल्या. तर डी कॉकने ४३ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. डी कॉकने आपल्या खेळीत ५ चौकार आणि १ षटकार लगावला. निकोलस पूरन २३ आणि मार्कस स्टोइनिस ८ धावांवर नाबाद राहिला.
तत्पूर्वी, चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १७६ धावा केल्या होत्या. सीएसकेसाठी जडेजाने ४० चेंडूत ५ चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने नाबाद ५७ धावा केल्या. तर धोनीने ९ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद २८ धावा केल्या. अजिंक्य रहाणेने ३६ धावा केल्या. गायकवाड १७ धावा करून बाद झाला. रचिनने शून्यावर विकेट गमावली. मोईनने ३० धावा केल्या.
लखनौकडून कृणाल पांड्याने २ बळी घेतले. बिश्नोई, स्टोइनिस, मोहसीन आणि यश ठाकूर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
संबंधित बातम्या