लंडन स्पिरिट वुमन या संघाने 'द हंड्रेड वुमेन्स २०२४' चे विजेतेपद पटकावले आहे. भारताच्या दीप्ती शर्मा हिने संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, तिने विजयी षटकार ठोकून लंडन स्पिरिटला द हंड्रेड वुमनची पहिली ट्रॉफी मिळवून दिली.
लंडन स्पिरिट वुमन आणि वेल्श फायर वुमन यांच्यात खेळला गेलेला अंतिम सामना अतिशय रोमांचक झाला आणि शेवटपर्यंत चालला.
लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या लंडन स्पिरीट संघाला विजेतेपदासाठी शेवटच्या ३ चेंडूत ४ धावांची गरज होती. तोपर्यंत संघाने ६ विकेट गमावल्या होत्या. भारतीय क्रिकेट संघाची स्टार दीप्ती शर्मा स्ट्राइकवर होती. एकेरी घेण्याऐवजी दीप्तीने गोलंदाजी करणाऱ्या हिली मॅथ्यूजला षटकार खेचून संघाला विजय मिळवून दिला. दीप्तीचा षटकार पाहून तिच्या संघातील बाकीचे खेळाडू पूर्णपणे चकित झाले.
लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळल्या गेलेल्या विजेतेपदाच्या सामन्यात वेल्श फायरने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित १०० चेंडूत ८ बाद ११५ धावा केल्या. जेस जोनासेनने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि ४१ चेंडूत ८ चौकारांच्या मदतीने ५४ धावा केल्या. यादरम्यान लंडन स्पिरिटकडून इवा ग्रे आणि सारा ग्लेनने २-२ बळी घेतले.
११६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लंडन स्पिरिट संघाने ९८ चेंडूत ६ बाद ११८ धावा करून विजयाची नोंद केली. जॉर्जिया रेडमायनने संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली आणि ३२ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने ३४ धावा केल्या. या शानदार खेळीसाठी जॉर्जिया रेडमायनला 'प्लेअर ऑफ द मॅच'चा किताबही देण्यात आला.
लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या लंडन स्पिरिटच्या फलंदाजांना वेल्श फायरची गोलंदाजी रोखू शकली नाही. वेल्श फायरकडून शबनिम इस्माईलने सर्वाधिक ३ बळी घेतले. याशिवाय बाकीचे गोलंदाज जवळपास सपशेल अपयशी ठरले. अशाप्रकारे कमकुवत गोलंदाजीमुळे वेल्श फायरला विजेतेपदाचा सामना गमवावा लागला.