कॅरेबियन भूमीवर मॅक्स-६० (Max60) कॅरिबियन लीग २०२४ स्पर्धा सुरू आहे. या लीगचा तिसरा सामना सोमवारी (१९ ऑगस्ट) कॅरिबियन टायगर्स आणि ग्रँड केमन जग्वार्स यांच्यात झाला. या सामन्यात दिग्गज गोलंदाज लोगान व्हॅन बीकने इतका मार खाल्ला की तो आयुष्यभर हे विसरू शकणार नाही.
खरं तर, या सामन्यात असं काही घडलं ज्याची कदाचित कोणी कल्पनाही केली नसेल. नेदरलँड्सचा खेळाडू लोगान व्हॅन बीक हा या स्पर्धेत ग्रँड केमन जग्वार्सचा भाग आहे. या सामन्यात लोगान व्हॅन बीकच्या १२ चेंडूंवर कॅरेबियन टायगर्सच्या फलंदाजांनी ६० धावांचा पाऊस पाडला.
कॅरेबियन टायगर्सने प्रथम फलंदाजी करताना १० षटकांत ३ बाद १५३ धावा केल्या, मात्र या सामन्यात लोगान व्हॅन बीकचा स्पेल चर्चेचा विषय राहिला आहे.
जोश ब्राउन आणि निक हॉबसन यांनी मिळून दोन वेगवेगळ्या षटकांत लोगन व्हॅन विकच्या गोलंदाजीवर ६० धावा कुटल्या. होय! व्हॅन बीकने एका षटकात ३७ आणि पुढच्या षटकात २३ धावा दिल्या.
वास्तविक ग्रँड केमन जग्वार्समध्ये मिचेल मॅकक्लेलन, जोश लिटल आणि सिकंदर रझा सारखे खेळाडू होते. या तिन्ही गोलंदाजांनी ६ षटकात ६४ धावा दिल्या, पण एकट्या लोगान व्हॅन बीकने ६० धावा दिल्या. याशिवाय टेरेन्स हिंड्सने २ षटकांत २५ धावा दिल्या.
कॅरेबियन टायगर्सच्या १५३ धावांना प्रत्युत्तरात फलंदाजीला आलेल्या ग्रँड केमन जॅग्वार्सला १० षटकांत ८ गडी गमावून केवळ ८८ धावा करता आल्या. अशाप्रकारे ग्रँड केमन जग्वार्सला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले.
लोगान व्हॅन बीक हे क्रिकेट जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे. नेदरलँड क्रिकेट संघाच्या उभारणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. नेदरलँडसाठी त्याने ३३ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४६ आणि ३१ टी-20 सामन्यांमध्ये ३६ बळी घेतले आहेत. T-20 मध्ये त्याचा इकॉनॉमी रेट ७.५० आहे.
या क्रिकेटरचा जन्म न्यूझीलंडमध्ये झाला असला तरी नंतर तो दरलँड्सला गेला. आत्तापर्यंत लोगान व्हॅन बीक नेदरलँड्सकडून ३३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. लोगान व्हॅन बीकने एकदिवसीय सामन्यात ४६ विकेट घेतल्या आहेत. याशिवाय एकदिवसीय फॉरमॅटमध्ये लोगान व्हॅन बीकच्या नावावर ४७७ धावा आहेत.
तसेच, लोगान व्हॅन बीकने आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यात ३६ विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर लोगान व्हॅन बीकच्या नावावर या फॉरमॅटमध्ये १०२ धावा आहेत.
व्हॅन बीकने आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत ५५४ विकेट घेतल्या आहेत. व्हॅन बीकने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २०६, लिस्ट ए मध्ये १८१ आणि टी-20 मध्ये १६७ विकेट्स घेतल्या आहेत. MAX60 लीगमध्ये अशा अनुभवी खेळाडूची बेदम धुलाई शोभत नाही. मॅक्स-६० लीगमधील लोगान व्हॅन बीकचा स्पेल क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय राहिला आहे.