Litton Das Century : २६ धावांवर ६ फलंदाज बाद, यानंतर लिटन दासनं शतक ठोकलं, रावळपिंडीत पाक गोलंदाज रडकुंडीला-litton das century against pakistan for bangladesh in rawalpindi 2nd test pakistan vs bangladesh 2nd test highlights ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Litton Das Century : २६ धावांवर ६ फलंदाज बाद, यानंतर लिटन दासनं शतक ठोकलं, रावळपिंडीत पाक गोलंदाज रडकुंडीला

Litton Das Century : २६ धावांवर ६ फलंदाज बाद, यानंतर लिटन दासनं शतक ठोकलं, रावळपिंडीत पाक गोलंदाज रडकुंडीला

Sep 01, 2024 05:27 PM IST

लिटन दासने पाकिस्तानविरुद्ध दमदार कामगिरी करत शतक झळकावले. बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात रावळपिंडीत दुसरी कसोटी खेळली जात आहे.

Litton Das Century : लिटन दासने पाकिस्तानी गोलंदाजांना रडवलं, रावळपिंडीत कसोटीत ठोकलं दमदार शतक
Litton Das Century : लिटन दासने पाकिस्तानी गोलंदाजांना रडवलं, रावळपिंडीत कसोटीत ठोकलं दमदार शतक (AFP)

रावळपिंडी येथे पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. आज (१ सप्टेंबर) सामन्याचा तिसरा दिवस असून बांगलादेशने दमदार पुनरागमन केले आहे. एकवेळ बांगलादेशचे २६ धावांत ६ फलंदाज बाद झाले होते. पण त्यानंतर लिटन दास आणि मेंहदी हसन मिराज यांनी संघाला सावरले.

कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. बांगलादेशकडून लिटन दासने दमदार फलंदाजी करताना शतक झळकावले. त्याने गोलंदाजांची अवस्था बिघडवली.

पाकिस्तानने पहिल्या डावात सर्वबाद २७४ धावा केल्या होत्या. याला प्रत्युत्तर म्हणून बांगलादेशचा संघ फलंदाजी करत आहे. त्यांच्याकडून लिटन दास याच्यासह मेहदी हसन मिराजनेही चमकदार कामगिरी केली. त्याने ७८ धावांची खेळी खेळली.

बांगलादेशच्या पहिल्या डावात विकेटकीपर लिटन दास सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. या डावात त्याने दमदार शतक झळकावले. लिटनने मेहदी हसनसोबत भक्कम भागीदारी रचली. पण मेहदी हसन मिराज १२४ चेंडूंचा सामना करताना ७८ धावा करून बाद झाला. त्याने १२ चौकार आणि १ षटकार मारला.

यानंतर लिटनने आपले शतक पूर्ण केले. हे वृत्त लिहिपर्यंत लिटनने २०१ चेंडूत ११९ धावा केल्या होत्या. त्याने १२ चौकार आणि २ षटकारही मारले. तर बांगलादेशने ७२ षटकांत ८ गडी गमावून २४० धावा केल्या होत्या. बांगलादेशी संघ ३४ धावांनी पिछाडीवर होता.

बांगलादेशचे २६ धावांत ६ फलंदाज बाद झाले होते

पाकिस्तानच्या पहिल्या डावातील २७४ धावांच्या प्रत्युत्तरात बांगलादेशची सुरुवात अतिशय खराब झाली. त्यांचे ६ फलंदाज अवघ्या २६ धावांत तंबूत परतले होते. मात्र, यानंतर विकेटकीपर फलंदाज लिटन दास आणि मेंहदी हसन मिराज यांनी सावध खेळी करत संघाला सावरले. दोन्ही खेळाडूंमध्ये १६५ धावांची भागीदारी झाली.