Saurashtra Cricket Association U-23 Cricketers : भारतीय क्रिकेटशी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे. डोमेस्टीक क्रिकेटचे ५ खेळाडू अडचणी सापडले आहेत. या खेळाडूंची चौकशी होण्याची शक्यता आहे.
वास्तविक, देशांतर्गत स्पर्धेदरम्यान या खेळाडूंकडून दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. हे खेळाडू सौराष्ट्राच्या अंडर २३ संघाकडून खेळतात. हे खेळाडू सीके नायडू अंडर २३ संघाचा भाग आहेत. या ५ क्रिकेटपटूंच्या किटमधून २७ दारूच्या बाटल्या आणि बिअरचे दोन बॉक्स जप्त करण्यात आले. ही घटना चंदीगड विमानतळावर उघडकीस आली.
सीके नायडू ट्रॉफीमध्ये २५ जानेवारी रोजी सौराष्ट्रने यजमान चंदीगडवर विजय मिळवला. यानंतर सौराष्ट्राचा संघ चंदीगडहून राजकोटला परत जात होता. चंदीगड विमानतळावर सामानाची तपासणी केली असता, संघातील ५ खेळाडूंच्या किटमधून २७ दारूच्या बाटल्या आणि २ बिअरचे बॉक्स सापडले.
या घटनेनंतर सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने एक निवेदन सादर केले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, 'चंदीगडमध्ये एक कथित घटना घडली आहे. संबंधितांनी ती सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निदर्शनास आणून दिली आहे. कथित घटना दुर्दैवी आणि असह्य आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची नैतिकता/शिस्तपालन समिती आणि सर्वोच्च परिषद या घटनेची सखोल चौकशी करेल आणि योग्य ती शिस्तभंगाची कारवाई करेल".
गुजरात ड्राय स्टेट आहे. राज्यात दारू बंदी असल्याने कुणालाही दारू नेण्याची परवानगी नाही.