Liam Livingstone news marathi : पुढील वर्षी होणाऱ्या क्रिकेट आयपीएलच्या मेगा लिलावात अनेक खेळाडूंनी कोटींची उड्डाणं घेतली आहेत. त्यात आता इंग्लंडचा स्फोटक फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनची भर पडली आहे. आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं मेगा लिलावात तब्बल ८.७५ कोटी रुपये मोजून त्याला आपल्या संघात घेतलं आहे.
जेद्दा इथं नुकताच आयपीएल २०२५ साठी मेगा लिलाव झाला. त्यावेळी इंग्लंडचा आक्रमक फलंदाज लियाम लिव्हिंगस्टोनला घेण्यासाठी आरसीबी (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्ज (CSK) या दोन संघांमध्ये बोलीयुद्ध रंगलं होतं, मात्र अखेर बंगळुरू संघाला विजय मिळवण्यात यश आलं.
लियाम लिव्हिंगस्टोन यानं २०१९ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं. तेव्हापासून तीन हंगाम तो पंजाब किंग्जकडून खेळला. या तीन मोसमांत त्यानं ८२७ धावा केल्या. अबुधाबीमध्ये सुरू असलेल्या टी-१० लीगमध्ये लिव्हिंगस्टोननं अवघ्या १५ चेंडूंत ५० धावा ठोकण्याचा पराक्रम केला आहे. त्यामुळं त्याचा समावेश आयपीएलमधील संघांसाठी महत्त्वाचा आहे.
आरसीबीमध्ये मिळालेल्या संधीमुळं लियाम लिव्हिंगस्टोनही खूष झाला आहे. 'विराट कोहलीसोबत खेळण्यास मी उत्सुक आहे. ऑक्शन खूपच उत्साहवर्धक होतं. बेंगळुरूचं मैदानही मला लकी आहे. इथले चाहते जबरदस्त आहेत. आरसीबी ही कदाचित आयपीएलमधील सर्वात मोठी फ्रँचायझी आहे. आमचे खेळाडू खूप चांगले आहेत. अतिशय हुशारीनं त्यांची निवड करण्यात आल्याचं दिसतं. या टीमसोबत खेळायला मजा येईल. माझ्यासाठी ही नवी सुरुवात आहे, असं तो म्हणाला.
‘विराट कोहली, ख्रिस गेल आणि एबी डिव्हिलियर्स या आरसीबीच्या स्टार त्रिकुटाला टीव्हीवर पाहिल्याची आठवणही त्यानं सांगितली. आता मी कोहली आणि फिल सॉल्ट यांच्याबरोबर मैदाना गाजवण्यास उत्सुक आहे, असं तो म्हणाला. फिल सॉल्ट याला आरसीबीनं तब्बल ११.५ कोटी रुपयांना करारबद्ध केलं आहे.