Lalit Modi On IPL : आयपीएलचे माजी प्रमुख ललित मोदी यांनी धक्कादायक विधान केले आहे. एका पॉडकास्टमध्ये ललित मोदींनी आयसीसीचे माजी अध्यक्ष आणि सीएसकेचे मालक एन श्रीनिवासन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ललित मोदी म्हणतात की, श्रीनिवासन आयपीएलमधील सीएसकेच्या सामन्यांमध्ये पंच फिक्स करायचे.
वास्तविक, आयपीएलचे संस्थापक ललित मोदी यांनी राज शामानी याच्या यूट्यूब चॅनलवर पाच वेळा आयपीएल चॅम्पियन टीम चेन्नई सुपर किंग्जबद्दल एक मोठी गोष्ट सांगितली.
तसेच, ललित मोदींनी ते मान्य केले आणि सांगितले, की होय आम्ही हेराफेरी केली होती. आणि प्रत्येक फ्रँचायझीला याची माहिती होती. अँण्ड्रू फ्लिंटॉफसाठी बोली लावू नका, असे आम्ही सर्वांनाच सांगितले होते, कारण अँण्ड्रू फ्लिंटॉफ हा श्रीनिवासन यांना त्यांच्या सीएसके संघात हवा होता.
यासोबतच ललित मोदींनी सीएकेचे मालक श्रीनिवासन यांच्यावर आयपीएलमधील पंच फिक्सिंगचा आरोप केला आणि त्यांनी सामन्यांदरम्यान पंच बदलण्यास सुरुवात केली होती. सीएसकेच्या सामन्यांमध्ये पंच बदलले जायचे. माझ्यासाठी ही समस्या होती कारण हे सरळ एक फिक्सिंगच होती. यासाठी मी त्यांना नकार दिल्यावर ते माझ्याविरुद्ध गेले.
चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलच्या इतिहासात एकूण ५ वेळा विजेतेपद पटकावले आहे. CSK संघाने १० वेळा IPL फायनलमध्ये प्रवेश केला आहे, तर १२ वेळा प्लेऑफचे तिकीट मिळवले आहे. CSK ने २०१०, २०११, २०१८, २०२१ आणि २०२३ मध्ये IPL चे विजेतेपद पटकावले आहे.
२०१३ मध्ये आयपीएल फिक्सिंग प्रकरणात संघ मालक श्रीनिवासनचा सहभाग असल्याने CSK वर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. २०१८ मध्ये त्यांनी पुनरागमन केले आणि यावर्षी त्याने आयपीएलचे विजेतेपद पटकावले.
आयपीएलचे संस्थापक ललित मोदी २०१० मध्ये मनी लाँड्रिंगचा आरोप झाल्यानंतर देश सोडून पळाले होते. सध्या ते लंडनमध्ये राहत आहेत. देश सोडल्यानंतर भारत सरकारने त्यांना फरारी घोषित केले होते. २०१० मध्ये आयपीएलमध्ये फसवणूक केल्याच्या आरोपाखाली त्यांना निलंबित करण्यात आले होते. मोदींना बीसीसीआयमधूनही निलंबित करण्यात आले होते.