Kwena Maphaka U19 World Cup 2024 : दक्षिण आफ्रिकेत सध्या अंडर १९ वर्ल्डकपचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत यजमान आफ्रिकने वेस्ट इंडिजचा सहज पराभव केला. आफ्रिकेच्या पहिल्या विजयाचा हिरो वेगवान गोलंदाज क्वेना माफाका हा ठरला. पण माफाका त्याच्या मॅन विनिंग कामगिरीपेक्षा एका वक्तव्यामुळे चांगलाच चर्चेत आला आहे.
वास्तविक, क्वेना माफाकाने स्वत:ची तुलना टीम इंडियाचा आणि जगातील सर्वोत्त गोलंदाज जसप्रीत बुमराहशी केली आहेय. क्वेना माफाका म्हणाला, 'की जसप्रीत बुमराह खूप चांगला गोलंदाज आहे पण कदाचित मी त्याच्यापेक्षा चांगला आहे'.
क्वेना माफाकाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात ५ विकेट घेतल्या. सामन्यानंतर त्याच्या गोलंदाजीची तुलना बुमराहसोबत करण्यात आली. याला उत्तर देताना माफाकाने हे वक्तव्य केले.
वेगवान गोलंदाज क्वेना माफाकाने वेस्ट इंडिजविरुद्ध आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले. खासकरून, त्याने त्याच्या यॉर्करने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले, त्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी क्वेना माफाकाची तुलना जसप्रीत बुमराहशी करण्यास सुरुवात केली.
तत्पूर्वी, आफ्रिका-वेस्ट इंडिज सामन्यात वेस्ट इंडिजला ३१ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यजमान दक्षिण आफ्रिकेने ५० षटकांत ९ गडी गमावून २८५ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हॉन मरायसने सर्वाधिक ६५ धावांची खेळी खेळली.
प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ ४०.१ षटकांत २५४ धावांवर गारद झाला. वेस्ट इंडिजकडून ज्वेल अँड्र्यूने शानदार शतक झळकावले. त्याने ९६ चेंडूत १४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने १३० धावा केल्या, मात्र त्याला संघाचा पराभव टाळता आला नाही.