टी-20 वर्ल्डकप २०२४ च्या सुपर ८ सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा २४ धावांनी पराभव केला आहे. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियन संघाच्या उपांत्य फेरीतील आशांना मोठा धक्का बसला आहे.
या सामन्यात प्रथम खेळताना भारतीय संघाने २० षटकांत ५ बाद २०५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ केवळ १८१ धावाच करू शकला. कर्णधार रोहित शर्माने दमदार फलंदाजी केली.
हिटमॅनने अवघ्या ४१ चेंडूत ९२ धावांची खेळी केली. गोलंदाजीत अर्शदीप सिंगने ३ बळी घेतले. याशिवाय कुलदीप यादवने चार षटकांत २४ धावा देत दोन बळी घेतले. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने सर्वाधिक ७६ धावा केल्या. तर कर्णधार मिचेल मार्शने ३७ धावांची खेळी केली.
भारताच्या २०६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर डेव्हिड वॉर्वर पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बाद झाला. त्याला अर्शदीप सिंगने स्लीपमध्ये झेलबाद केले.
पण त्यानंतर दुसरा सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि तिसऱ्या नंबरवर आलेला कर्णधार मिचेल मार्श यांनी तुफानी फलंदाजी सुरू केली. दोघांनी पॉवरप्लेच्या ६ षटकात ६० ठोकल्या. दोघांनी ८ षटकात ८३ धावांची भागिदारी केली. पण कुलदीप यादवने ही भागिदारी तोडली. विशेष म्हणजे, कुलदीप यादवने ऑस्ट्रेलियाच्या धावांचा वेग कमी केला. यामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दबावात येत खराब फटके खेळले.
कुलदीपच्या गोलंदाजीवर अक्षर पटेलने सीमारेषेवर हवेत झेप घेत अप्रतिम झेल घेतला. मार्शने २८ चेंडूत ३७ धावा केल्या.
यानंतर आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने पहिल्या चेंडूपासूनच फटके खेळायला सुरुवात केली. त्याने १२ चेंडूत २० धावा केल्या. मॅक्सवेल आणि हेड ऑस्ट्रेलियाला विजयाच्या जवळ घेऊन जातील असे वाटत होते, पण १३व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कुलदीप यादवने मॅक्सवेलला क्लीन बोल्ड करून तंबूत पाठवले.
त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या धावांचा वेग मंदावला. कुलदीपने ४ षटकात २४ धावा देत २ बळी घेतले तर अक्षरने ३ षटकात २१ धावा देत एक विकेट घेतला. अक्षरने मार्कस स्टोइनीसला झेलबाद केले.
ऑस्ट्रेलियाला २४ चेंडूत ६० धावांची गरज होती. ट्रेव्हिड क्रीजवर होता, अशा स्थितीत बुमराहने १७व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हेडची शिकार केली. हेड ४३ चेंडूत ७६ धावा करून बाद झाला. तो बाद झाल्यावर सामना जवळपास भारताच्या खिशात आला होता. बुमराहने १७ वे आणि १९ षटक अप्रतिम टाकले.
संबंधित बातम्या