अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, शार्दुल ठाकूर, श्रेयस लाड, शम्स मुलाणी, तनुष कोटियन अशी संपूर्ण प्लेइंग इलेव्हन पाहिल्यास कोणत्याही संघाला घाम फुटेल. या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्याही आंतरराष्ट्रीय संघाला पराभूत करण्याची ताकद आहे. ही प्लेइंग इलेव्हन रणजी ट्रॉफी खेळणाऱ्या मुंबई संघाची आहे.
पण असे असतानाही क्रुणाल पांड्या याच्या नेतृत्वाखालील बडोद्याने अप्रतिम कामगिरी करत मुंबईचा ८४ धावांनी धुव्वा उडवला आहे. वडोदरा येथील कोटंबी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबईला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
या सामन्यात बडोद्याने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात सर्व गडी गमावून २९० धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून मितेश पटेलने सर्वाधिक ८६ धावांची तर अजित शेठने ६६ धावांची खेळी केली. तर मुंबईकडून तनुष कोटियनने ४ आणि शम्स मुलानीने ३ बळी घेतले, तर शार्दुल ठाकूरने २ बळी घेतले.
प्रत्युत्तरात, मुंबई संघाला पहिल्या डावात सर्व १० विकेट्स गमावून केवळ २१४ धावा करता आल्या. आयुष म्हात्रेने ५२, हार्दिक तामोरेने ४०, शार्दुल ठाकूरने २७ आणि कर्णधार अजिंक्य रहाणेने २९ धावा केल्या. बडोद्यातर्फे भार्गव भट्टने ४, अभिमन्यू सिंगने ३ आणि महेश पिठियाने २ बळी घेतले.
यानंतर मुंबईने बडोद्याला १८५ धावांत सर्वबाद करून सामन्यात पुनरागमन केले. या डावात बडोद्यातर्फे कर्णधार कृणाल पंड्याने ५५ धावा आणि महेश पिठियाने ४० धावा केल्या, तर तनुष कोटियनने ५ बळी घेतले. हिमांशू सिंगच्या नावावर ३ विकेट्स होत्या.
मुंबईला शेवटच्या डावात २६२ धावांचे लक्ष्य मिळाले. त्यांची भक्कम फलंदाजी पाहता हे फार कठीण वाटले नाही, पण कृणालच्या संघाने आश्चर्यकारक कामगिरी केली. भार्गव भट्टने पुन्हा दम दाखवत ६ विकेट घेत मुंबईचा डाव १७७ धावांवर गारद केला. मुंबईकडून सिद्धेश लाडने ५९ धावा केल्या. तर कर्णधार अजिंक्य रहाणेसह इतर सर्व फलंदाज स्वस्तात बाद झाले.
संबंधित बातम्या