कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा ८ विकेट्सनी धुव्वा उडवत तिसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन होण्याचा मान मिळविला आहे. आयपीएल २०२४ च्या फायनलमध्ये (२६ मे) चेन्नईच्या चेपॉकवर हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर केकेआरच्या गोलंदाजांनी हैदराबादला केवळ ११३ धावात गारद केले.
प्रत्युत्तरात केकेआरच्या फलंदाजांनी आक्रमक फलंदाजी हैदराबादने दिलेले लक्ष्य १०.३ षटकातच गाठले.
केकेआर संघाकडून व्यंकटेश अय्यरने २६ चेंडूत ५२ धावांची नाबाद खेळी केली. तर रहमानउल्ला गुरबाजने ३२ चेंडूत ३९ धावा केल्या. हैदराबादकडून पॅट कमिन्स आणि शाहबाज अहमद यांनी १-१ बळी घेतला.
तत्पूर्वी या सामन्यात केकेआरने सनरायझर्सला १८ षटकांत ११३ धावांत ऑलआउट केले.हैदराबाद संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, जो चुकीचा ठरला. या सामन्यात संघाची सुरुवात खूपच खराब झाली. केकेआरच्या गोलंदाजांसमोर केवळ कर्णधार पॅट कमिन्स २४ धावा करू शकला आणि एडन मार्कराम सर्वाधिक २० धावा करू शकला.
या दोघांच्याशिवाय अन्य कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा आकडा गाठता आला नाही. त्यांच्यानंतर हेनरिक क्लासेनने १६ धावा केल्या. तर केकेआर संघाकडून वेगवान गोलंदाज आंद्रे रसेलने ३ विकेट घेतल्या. तर मिचेल स्टार्क आणि हर्षित राणा यांनी २-२ विकेट घेतल्या. वैभव अरोरा, सुनील नरेन आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.
कोलकाता नाईट रायडर्स याआधी २०१२ आणि २०१४ मध्ये आयपीएल चॅम्पियन बनले होते. केकेआरने २०१२ मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा ५ गडी राखून आणि २०१४ मध्ये पंजाब किंग्जचा ३ गडी राखून पराभव करून आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते.
२०१४ नंतर, KKR २०२१ मध्ये अंतिम फेरीत पोहोचला होता, पण विजेतेपदाच्या लढतीत CSK कडून २७ धावांनी पराभूत झाला. आता अखेर केकेआरला १० वर्षांनंतर तिसऱ्यांदा इंडियन प्रीमियर लीग ट्रॉफी जिंकण्यात यश आले आहे. यासह कोलकाताने आयपीएलच्या इतिहासात तिसऱ्यांदा चॅम्पियन होण्याचा मान मिळवला.