आयपीएल २०२४ च्या ३६व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा एका धावाने पराभव केला आहे. केकेआरने प्रथम खेळताना २२२ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती. दुसरीकडे लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीला सुरुवात चांगली झाली नाही. विराट कोहली आणि फाफ डू प्लेसिस चौथ्याच षटकातच पॅव्हेलियनमध्ये परतले होते.
विराटने १८ धावा केल्या तर डु प्लेसिसने केवळ ७ धावा केल्या. दरम्यान, तिसऱ्या विकेटसाठी विल जॅक आणि रजत पाटीदार यांच्यातील १०२ धावांच्या धडाकेबाज भागीदारीने आरसीबीला सामन्यात परत आणले.
बेंगळुरूसाठी विल जॅकने ३२ चेंडूत ५५ धावा केल्या, ज्यात त्याने ४ चौकार आणि ५ षटकार मारले. त्याच्याशिवाय पाटीदारने शानदार फलंदाजी करत २३ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. दरम्यान, सुनील नरेनने १३व्या षटकात २ बळी घेत सामन्याचा मार्गच बदलून टाकला होता.
एकवेळ ११ षटकांनंतर आरसीबीची धावसंख्या २ बाद १३७ धावा होती. पण पुढच्या २ षटकांत बेंगळुरूने ४ महत्त्वाच्या विकेट गमावल्या, त्यामुळे सामना पूर्णपणे केकेआरच्या दिशेने फिरला.
१३व्या षटकानंतर आरसीबीची अवस्था ६ बाद १५५ अशी होती. अशा परिस्थितीत इम्पॅक्ट प्लेयर म्हणून आलेल्या सुयश प्रभुदेसाईने जबाबदारी स्वीकारली. डावाचा दुसरा टाईम-आऊट १६व्या षटकानंतर झाला, तोपर्यंत आरसीबीची धावसंख्या ६ गडी बाद १८१ धावा होती. त्यांना २४ चेंडूत विजयासाठी ४२ धावांची गरज होती. प्रभुदेसाई आणि दिनेश कार्तिक क्रीजवर होते.
शेवटच्या २ षटकात आरसीबीला विजयासाठी ३१ धावांची गरज होती, परंतु १९व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कार्तिक बाद झाल्यामुळे बेंगळुरूच्या विजयाची शक्यता जवळपास संपुष्टात आली होती. जेव्हा शेवटच्या षटकात २१ धावांची गरज होती. कर्ण शर्माने मिचेल स्टार्कच्या षटकात ३ षटकार मारून सामना रोमांचक बनवला, परंतु कर्ण शर्मा पाचव्या चेंडूवर झेलबाद झाला. यानंतर आरसीबीनला शेवटच्या चेंडूवर ३ धावा हव्या होत्या. पण नवा फलंदाज लॉकी फर्ग्युसन शेवटच्या चेंडूवर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात धावबाद झाला, त्यामुळे आरसीबीला एका धावाने पराभवाचा सामना करावा लागला.
संबंधित बातम्या