कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये एका महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचारानंतर देशातील अनेक भागांमध्ये निदर्शने होत आहेत. या दरम्यान, आता अनेक क्रिकेटपटूंनीही या प्रकरणी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
टीम इंडियाचा टी-20 कर्णधार आणि अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादव यानेही कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. आपल्या मुलांना चांगली शिकवण देण्याचा सल्ला सूर्यकुमार यादवने दिला आहे. सूर्याने इन्स्टाग्रामवर मेसेज शेअर केला आहे.
सूर्याने इन्स्टाग्रामवर स्टोरीमध्ये कोलकाता प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. त्याने लिहिले, की "आपल्या मुलींची सुरक्षा करा, यानंतर त्याने हे वाक्य खोडले आहे, आणि त्याखाली लिहिले, की "तुमच्या मुलांना शिक्षित करा." तुमचा भाऊ, तुमचे वडील, तुमचा पती आणि तुमच्या मित्रांना चांगले शिक्षण द्या.''
सूर्यापूर्वी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यानेही या प्रकरणी प्रतिक्रिया दिली होती. कोलकाता प्रकरणावर त्याने संताप व्यक्त केला होता.
सूर्यकुमार यादव लवकरच दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसणार आहे. भारतासाठीही त्याने चांगली कामगिरी केली आहे. सूर्याने टीम इंडियासाठी एक कसोटी सामना खेळला आहे. त्याने ३७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. सूर्याने या फॉरमॅटमध्ये ७७३ धावा केल्या आहेत. या काळात त्याने ४ अर्धशतके झळकावली आहेत.
त्याने टीम इंडियासाठी ७१ टी-20 सामन्यात २४३२ धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने ४ शतके आणि २० अर्धशतके केली आहेत. सूर्याने १५० IPL सामन्यात ३५९४ धावा केल्या आहेत. या लीगमध्ये २ शतके आणि २४ अर्धशतके झळकावली आहेत.
सूर्यकुमार यादव दुलीप ट्रॉफी २०२४ मध्ये सी संघाकडून खेळणार आहे. ऋतुराज गायकवाड या संघाचा कर्णधार आहे. सूर्या आणि ऋतुराज सोबत टीम C मध्ये साई सुदर्शन, रजत पाटीदार आणि उमरान मलिक हे देखील आहेत. दुलीप ट्रॉफीचा पहिला सामना ५ सप्टेंबरपासून अ आणि ब संघामध्ये खेळवला जाणार आहे. टीम सी चा पहिला सामना टीम डी विरुद्ध आहे.