T20 World Cup 2024 Super 8 : वेस्ट इंडिज आणि यूएसए येथे खेळल्या जात असलेल्या विश्वचषक स्पर्धेत बहुतेक संघांनी प्रत्येकी किमान एक सामना खेळला आहे. पण, इंग्लंड आणि स्कॉटलंड यांच्यातील सामना पावसामुळे वाहून गेला, त्यामुळे ब गटात सुपर-८ मध्ये जाण्याची समीकरणं बिघडत चालले आहेत.
ब गटात नामिबिया सध्या २ गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर दुसरीकडे सामना रद्द झाल्यामुळे इंग्लंड आणि स्कॉटलंडला प्रत्येकी १ गुण मिळाला आहे. आता इंग्लंडचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे, जर इंग्लंडने तो सामना गमावला तर गतविजेत्या इंग्लंड संघासाठी सुपर-८ मध्ये जाण्याचा मार्ग कठीण होईल.
इंग्लंड २०२२ च्या टी-20 वर्ल्डकपचा चॅम्पियन आहे. तर या वर्ल्डकपमध्ये सध्या त्यांच्या खात्यात १ गुण आहे. ८ जून रोजी त्यांचा पुढील सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे. जोस बटलरच्या नेतृत्वाखालील या सामन्यात इंग्लिश संघ पराभूत झाला तर २ सामन्यांत त्यांचा केवळ १ गुण असेल.
त्यानंतर, इंग्लंडने उर्वरित २ सामने जिंकल्यास त्यांचे एकूण ५ गुण होतील. नामिबियाच्या संघाने पहिल्या सामन्यात दाखवून दिले आहे, की त्यांचे खेळाडू पराभव स्वीकारण्यास अजिबात तयार नाहीत.
त्याचवेळी स्कॉटलंडच्या फलंदाजांनीही इंग्लंडविरुद्ध शानदार फलंदाजी दाखवली होती. त्यामुळे नामिबिया आणि स्कॉटलंडमधील कोणत्याही संघाने गट टप्प्यातील सामने संपेपर्यंत आणखी २ सामने जिंकण्यात यश मिळवले, तर इंग्लंडसाठी धोक्याची घंटा वाजणार आहे.
सुपर-८ मध्ये जाण्यासाठी ऑस्ट्रेलिया सध्या या गटातील सर्वात मोठा दावेदार आहे, मात्र स्कॉटलंडविरुद्धचा सामना रद्द झाल्यामुळे इंग्लिश संघावर संकटाचे ढग दाटून आले आहेत.
इंग्लंड आधीच कोंडीत अडकला आहे आणि सुपर-८ मध्ये जाण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर त्यांना ऑस्ट्रेलियाला कोणत्याही किंमतीवर पराभूत करावे लागेल.
दरम्यान, २०२२ च्या टी-20 वर्ल्डकपमध्येही असाच प्रसंग उद्भवला होता. वास्तविक, त्यावेळी इंग्लंडला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा ग्रुप सामना जिंकणे आवश्यक होते, कारण त्यांचा आयर्लंडविरुद्ध ५ धावांनी पराभव झाला होता. पण तेव्हा ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यानंतर त्यांचे ३ सामन्यात ३ गुण होते.
पण जोस बटलरच्या इंग्लंडने तशाही परिस्थितीत फायनलपर्यंत मजल मारली आणि जेतेपद मिळवले.
संबंधित बातम्या