KL Rahul Asia Cup 2023 : भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज केएल राहुल आशिया चषक 2023 च्या पहिल्या दोन सामन्यांमधून बाहेर पडला आहे. राहुल पाकिस्तान आणि नेपाळविरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही. टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी राहुलच्या बाहेर पडल्याची माहिती दिली.
केएल राहुल दुखापतीमुळे बराच काळ टीम इंडियातून बाहेर होता. पण त्यानंतर फिट घोषित झाल्यानंतर आशिया चषकासाठीच्या संघात त्याचा समावेश करण्यात आला. आता तो पहिल्या दोन सामन्यात खेळणार नाही.
इंडियन प्रीमियर लीग 2023 दरम्यान राहुल जखमी झाला होता. तेव्हापासून तो सतत मैदानापासून दूर राहिला. रुग्णालयातून परतल्यानंतर राहुल फिट होण्यासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पोहोचला. येथे त्याने पुनरागमनासाठी खूप मेहनत घेतली.
यानंतर भारताने आशिया चषकासाठी संघाची घोषणा केली आणि त्यात राहुलचा समावेशही केला. पण तरीही राहुलच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह कायम आहे. तो तंदुरुस्त असता तर पहिल्या दोन सामन्यांसाठी त्याला वगळलेच नसते. यावर आता सोशल मीडिया चाहतेदेखील केएल राहुल फिट नव्हता तर संघात निवड केलीच का? असे प्रश्न उपस्थित करत आहेत. सोबतच आता पहिल्या दोन सामन्यात विकेटकीपर म्हणून कोण खेळणार हादेखली प्रश्न निर्माण झाला आहे. इशान किशन मुख्य संघात तर संजू सॅमसन राखीव खेळाडू म्हणून श्रीलंकेला जाणार आहेत.
आयसीसीच्या वृत्तानुसार, राहुल टीम इंडियासोबत श्रीलंकेला जाणार नाही. तो बंगळुरू येथील नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये राहील आणि ४ सप्टेंबरला आशिया कपच्या सुपर ४ सामन्यांसाठी टीम इंडियामध्ये सामील होईल.
केएल राहुलबद्दल द्रविड म्हणाले की, “त्याने खूप चांगली प्रगती केली आहे. पण आशिया कपच्या पहिल्या दोन सामन्यात तो खेळणार नाही. पुढील काही दिवस एनसीएमध्ये त्याची देखभाल केली जाईल'.
टीम इंडियाचे ४ खेळाडू दुखापतीमुळे मैदानाबाहेर होते. राहुलसोबत श्रेयस अय्यरही जखमी झाला होता. पण तो फिटनेसच्या सर्व मानकांवर खरा उतरला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी अय्यरला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा हे देखील दुखापतीमुळे बाहेर होते. पण दोघांनीही शानदार कमबॅक केले आहे.