India vs England Odi Nagpur : टी-20 मालिकेनंतर भारत आणि इंग्लंड यांच्यात आता ३ वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. पहिला एकदिवसीय सामना ६ फेब्रुवारी रोजी नागपुरात खेळवला जाणार आहे.
नागपुरात नेटमध्ये भारतीय खेळाडूंनी चांगलाच घाम गाळला. विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या दिग्गज फलंदाजांनी शानदार फटकेबाजी केली. तर केएल राहुल आणि ऋषभ पंत सारखे स्टार खेळाडूही मैदानावर आपल्या उत्कृष्ट लयीत दिसले.
विराट कोहली आणि रोहित शर्मासाठी २०२४ हे वर्ष दुःस्वप्नासारखे होते. या दोघांनी गेल्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये अत्यंत लज्जास्पद कामगिरी केली होती. पण आता वर्ष नवीन आहे आणि फॉरमॅट्सही वेगळे आहेत. अशा स्थितीत दोघांनाही त्यांची लय परत मिळवायची आहे. या दोघांनीही आपल्या जुन्या शैलीत नेटमध्ये शॉट्स खेळले.
दोन्ही दिग्गजांनी वेगवान गोलंदाजीविरुद्ध फलंदाजीचा सराव केला. यादरम्यान रोहित रिव्हर्स स्वीप खेळताना दिसला तर कोहलीनेही समोरून फटके मारले.
टीम इंडियाच्या सराव सत्रादरम्यान केएल राहुलने फलंदाजीसोबतच यष्टीरक्षणाचाही सराव केला. तर ऋषभ पंत फलंदाजीवर अधिक भर देताना दिसला. हे दृश्य पाहिल्यानंतर राहुल इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत विकेटकीपर म्हणून खेळू शकतो, असे मानले जात आहे. असे झाल्यास पंतला बाहेर बसावे लागू शकते किंवा दोन्ही खेळाडू एकत्र प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळू शकतात.
रोहित आणि शुभमन गिल सलामीला खेळतील, हे निश्चित मानले जात आहे. त्याच्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यरचा खेळू शकतात. पंत आणि राहुल यापैकी एकजण पाचव्या क्रमांकावर तर अष्टपैलू हार्दिक पंड्या सहाव्या क्रमांकावर खेळू शकतो.
प्रदीर्घ कालावधीनंतर वनडे संघात पुनरागमन करणाऱ्या मोहम्मद शमी याचे खेळणे निश्चित आहे. अर्शदीप सिंगसोबत हर्षित राणा त्याला वेगवान गोलंदाजीत साथ देऊ शकतो.
फिरकी विभागाबाबत बोलायचे झाले तर कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा प्लेइंग इलेव्हनमध्ये दिसू शकतात. टीम इंडियात सरप्राईज एन्ट्री करणाऱ्या वरुण चक्रवर्तीलाही संधी मिळू शकते. मात्र अशा परिस्थितीत कुलदीपला बाहेर बसावे लागू शकते.
टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन अशीच राहिली तर दोन खेळाडू वनडेमध्ये पदार्पण करतील. एक हर्षित राणा आणि दुसरा वरुण चक्रवर्ती. दोघांनी अद्याप एकही वनडे खेळलेला नाही. हर्षितने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आणि इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेदरम्यान कसोटीत टी-20 पदार्पण केले, तर वरुण फक्त टी-20 खेळतो.
२०२१ मध्ये त्याने या फॉरमॅटमध्ये पदार्पण केले होते. पण आता वरुण आणि हर्षित यांनाही वनडे कॅप मिळू शकते.
पहिल्या वनडेसाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत/केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, कुलदीप यादव/वरूण चक्रवर्ती.
संबंधित बातम्या