केएल राहुलच्या फिटनेसचा मुद्दा आता समजण्यापलीकडे गेला आहे. भारतीय संघाच्या फिजिओ आणि मेडिकल टीमने दिलेल्या माहितीनुसार, केएल राहुल पूर्णपणे तंदुरुस्त आहे. पण राहुल मात्र, सतत दुखापतींमुळे संघातून बाहेर पडत आहे. अशा स्थितीत राहुलच्या या 'अदृश्य दुखापतीने' निवड समिती आणि भारतीय टीम मॅनेजमेंटला संभ्रमात टाकले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल त्याच्या क्वाड्रिसेप्स स्नायूंच्या ताणाबद्दल (quadriceps injury) अधिक माहिती मिळवण्यासाठी इंग्लंडला गेला आहे. पण यामुळे टीम इंडियाची मेडीकल टीम थोडी हैराण झाली आहे. कारण मेडीकल टीमला राहुलच्या फिटनेसमध्ये कोणतीही समस्या आढळली नाही.
भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका सुरू आहे. केएल राहुलने या मालिकेतील पहिला हैदराबाद कसोटी सामना खेळला. यानंतर राहुल या मालिकेतील एकही सामना खेळलेला नाही. काही दिवसात राहुल फिट होऊन मालिका खेळेल असे मेडीकल टीमला वाटत होते. पण सामन्यापूर्वी तो केवळ ९० टक्के फिट वाटल्याने त्याला संघातून वगळण्यात आले.
परिणामी, त्यानंतरच्या कसोटींनाही राहुल मुकला. गेल्या वर्षी झालेल्या शस्त्रक्रियेमुळे राहुलच्या क्वाड्सबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. वैद्यकीय टीमने सुरुवातीला त्याला मालिकेतील तीन कसोटीत खेळण्यास मंजुरी दिली होती. पण केएल राहुलने त्याच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त केली.
विश्वचषक आणि दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेदरम्यान राहुलला कामाचा प्रचंड ताण सहन करावा लागला होता, तो फलंदाजी तसेच यष्टिरक्षक होता. त्याच्या क्वॉड्सवर अनेक स्कॅन करण्यात आले आहेत. चिंतेचे कोणतेही मोठे कारण नसले तरी , काही सूज दिसून आली आहे. हा अहवाल राहुलवर इंग्लंडमध्ये उपचार करणाऱ्या डॉक्टरांना पाठवण्यात आला असून २ मार्चपर्यंत त्याच्या प्रकृतीबाबत स्पष्टीकरण मिळण्याची अपेक्षा भारतीय क्रिकेट बोर्डाला आहे.