India vs Australia 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २२ नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरू झाला. आज (२३ नोव्हेंबर) सामन्याच्या दुसऱ्यादिवसअखेर भारतीय संघाची धावसंख्या १७२/० आहे. टीम इंडियाची एकूण आघाडी २१८ धावांची झाली आहे. यशस्वी जैस्वाल (९०) आणि केएल राहुल (६२) धावा करून नाबाद आहेत.
या सामन्यात भारतीय संघ पहिल्या डावात १५० धावांवरच गारद झाला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ पहिल्या डावात १०४ धावांत सर्वबाद झाला. यामुळे पहिल्या डावात भारताला ४६ धावांची आघाडी मिळाली.
यानंतर दुसऱ्या डावात टीम इंडियाने दमदार सुरुवात केली. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी पर्थ कसोटीत इतिहास रचला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत राहुल आणि यशस्वी यांच्यात पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी झाली.
विशेष म्हणजे, २००४ नंतर पहिल्यांदाच भारतीय सलामीवीरांनी ऑस्ट्रेलियात शतकी भागीदारी केली आहे.
राहुल आणि यशस्वी यांनी दमदार कामगिरी करत अर्धशतकेही झळकावली. या दोघांनी टीम इंडियाची धावसंख्या दुसऱ्या दिवसअखेर १७२ धावांपर्यंत नेली.
खरे तर २००४ नंतर भारतीय सलामीवीरांना ऑस्ट्रेलियात कसोटीत शतकी भागीदारी करता आली नव्हती. पण यशस्वी आणि राहुल यांनी हा पराक्रम करून दाखवला. २० वर्षांनंतर हा विक्रम झाला आहे.
यशस्वी आणि राहुलच्या नावावर आणखी एक विक्रम नोंदवला गेला आहे. यशस्वी-राहुल ही ऑस्ट्रेलियात सलामीवीर म्हणून सर्वाधिक चेंडूंचा सामना करणारी जोडी ठरली आहे. ५७ षटके खेळून काढली. हादेखील एक विक्रम आहे.
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी घातक गोलंदाजी केली. भारतीय संघ पहिल्या डावात १५० धावांवर सर्वबाद झाला होता. यानंतर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियन संघाला केवळ १०४ धावांत गारद केले. भारताकडून जसप्रीत बुमराहने ५ विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजने २ बळी घेतले. हर्षित राणाने ३ बळी घेतले.