भारतीय संघ ब्रिस्बेनमधील गाबा येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेतील तिसरा सामना खेळत आहे. पावसाने प्रभावित झालेल्या या कसोटीत भारताची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरल्याचे दिसत आहे. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजीसमोर टीम इंडियाची टॉप ऑर्डर टिकू शकली नाही.
केवळ केएल राहुल हाच गोलंदाजांचा धैर्याने सामना करू शकला. या मालिकेत फक्त केएल राहुलच्या बॅटमधूनच सातत्याने धावा येत आहेत.
केएल राहुल हा या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज आहे. गाबाच्या मैदानावर त्याने अर्धशतक ठोकले. भारतीय डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर यशस्वी जैस्वाल बाद झाला.
यानंतर शुभमन गिल, विराट कोहली आणि ऋषभ पंतही एक अंकी धावसंख्येवर बाद झाले. कर्णधार रोहित शर्मालाही केवळ १०धावा करता आल्या. दरम्यान, केएल राहुलने ८५ चेंडूत कसोटीतील १७ वे अर्धशतक पूर्ण केले.
यानंतर केएल राहुल आरामात शतक पूर्ण करेल, असे वाटत होते पण फिरकी गोलंदाज नॅथन लायनने त्याची शिकार केली. लायनच्या चेंडूवर स्लीपमध्ये स्टीव्ह स्मिथने त्याचा अप्रतिम झेल घेतला. राहुल ८४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने १३९ चेंडूत ८ चौकार मारले.
गाबाच्या खेळपट्टीवर केएल राहुलसाठी धावा करणे सोपे नव्हते. चौथ्या दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर त्याला जीवदान मिळाले. कर्णधार पॅट कमिन्सचा चेंडू राहुलच्या बॅटची कड घेऊन स्लिपमध्ये गेला. तिथे स्टीव्ह स्मिथने सोपा झेल सोडला.
स्टीव्हची गणना जगातील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकांमध्ये केली जाते पण त्यानंतरही तो हा चेंडू पकडू शकला नाही. या जीवनदानाचा राहुलने पुरेपूर फायदा घेतला.
केएल राहुलने कसोटीत घराबाहेर २००० धावा पूर्ण केल्या आहेत. राहुलने २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियात भारताकडून कसोटी पदार्पण केले होते. त्याच्या ७ कसोटी शतकांपैकी ६ परदेशात आहेत.
सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनील गावसकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, विराट कोहली, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, दिलीप वेंगसरकर, मोहिंदर अमरनाथ, मोहम्मद अझरुद्दीन, गुंडप्पा विश्वनाथ, महेंद्रसिंग धोनी, कपिल देव आणि रवी शास्त्री यांनीही भारताबाहेर २००० हून अधिक धावा केल्या आहेत.
संबंधित बातम्या