आयपीएल २०२४ चा अंतिम सामना आज (२६ मे) कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार आहे. या सामन्याला चेन्नईच्या चेप़क स्टेडियमवर सायंकाळी ७:३० वाजेपासून सुरुवात होईल.
सामान्यत: खेळातील स्पर्धा कर्णधार आणि त्यांचे संघ यांच्यात होते, पण ही आयपीएल फायनल यापेक्षा वेगळी आहे आणि यामुळेच हा सामना खूपच रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. कारण, एकीकडे क्रिकेटचा कुशल रणनीती गुरू गौतम गंभीर आहे तर दुसरीकडे दोन आयसीसी ट्रॉफी जिंकणारा पॅट कमिन्स.
एक दशकापूर्वी कोणीही कल्पना केली नसेल की कमिन्स असा कर्णधार बनेल जो ६ महिन्यांत एकदिवसीय विश्वचषक, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि ऍशेस जिंकेल. आता जर त्याने सनरायझर्सला आयपीएल ट्रॉफी मिळवून दिली तर हा एक अविश्वसनीय विक्रम होईल.
पहिल्या क्वालिफायरमध्ये दोन्ही संघ भिडले होते, ज्यात केकेआरने उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर सनरायझर्सचा पराभव केला होता. KKR ने चेन्नई येथे २०१२ मध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध शेवटची IPL फायनल खेळला होती, ज्यामध्ये गंभीरने कर्णधार म्हणून विजेतेपद पटकावले होते. गंभीरच्या नेतृत्वाखाली, केकेआरने २०१४ मध्ये पुन्हा विजेतेपद पटकावले आणि आता एक मार्गदर्शक म्हणून तो त्याच संघासाठी विजेतेपद मिळवण्याच्या उंबरठ्यावर आहे.
भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्याचाही तो प्रबळ दावेदार असून आयपीएल ट्रॉफीमुळे त्याचा दावा आणखी मजबूत होईल. २०१४ मध्ये कोलकाताने जेतेपद पटकावले तेव्हा कमिन्स संघाचा भाग होता. आता दोघेही आमनेसामने आहेत.
जर आपण संघांची तुलना केली तर, केकेआरकडे सुनील नरेन, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, श्रेयस आणि व्यंकटेश अय्यर सारखे मॅचविनर खेळाडू आहेत. तसेच नितीश आणि हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्तीसारखे मिस्ट्री गोलंदाज आहेत. दुसरीकडे, देशांतर्गत क्रिकेटपटू अभिषेक शर्मा आणि नितीश रेड्डी यांच्याशिवाय भुवनेश्वर कुमार, टी नटराजन आणि जयदेव उनाडकट यांनी सनरायझर्ससाठी चांगली कामगिरी केली आहे.
खडतर खेळपट्टीवर रॉयल्सला ३६ धावांनी पराभूत केल्यानंतर सनरायझर्सचे मनोबल उंचावलेले असेल, परंतु चेपॉकची विकेट वरुण (२० विकेट) आणि नरेन (१६ विकेट) यांना अनुकूल असेल, जे या हंगामात उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत.
सनरायझर्सचे फिरकी गोलंदाज अभिषेक आणि शाहबाज अहमद यांनी गेल्या सामन्यात चांगली कामगिरी केली. फलंदाजीत ट्रॅव्हिस हेड आणि हेनरिक क्लासेन यांच्याशिवाय अभिषेक, राहुल त्रिपाठी आणि रेड्डी यांना धावा कराव्या लागतील. केकेआरचे युवा वेगवान गोलंदाज हर्षित आणि वैभव अरोरा यांना हेडला शांत ठेवावे लागेल, ज्यांनी आतापर्यंत ५६७ धावा केल्या आहेत.
संबंधित बातम्या