KKR Vs SRH : शाहरूखसमोर आंद्रे रसेलची तुफान फटकेबाजी, ७ षटकारांसह ठोकलं अर्धशतक, केकेआरचा धावांचा डोंगर
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  KKR Vs SRH : शाहरूखसमोर आंद्रे रसेलची तुफान फटकेबाजी, ७ षटकारांसह ठोकलं अर्धशतक, केकेआरचा धावांचा डोंगर

KKR Vs SRH : शाहरूखसमोर आंद्रे रसेलची तुफान फटकेबाजी, ७ षटकारांसह ठोकलं अर्धशतक, केकेआरचा धावांचा डोंगर

Mar 23, 2024 09:22 PM IST

KKR Vs SRH IPL Scorecard : आयपीएल २०२४ चा तिसरा सामना आज (२३ मार्च) कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघ कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर आमनेसामने आहेत.

KKR Vs SRH IPL 2024 Scorecard
KKR Vs SRH IPL 2024 Scorecard (AP)

KKR Vs SRH Match Scorecard : आयपीएल २०२४ चा तिसरा सामना आज (२३ मार्च) कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळला जात आहे. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने निर्धारितत २० षटकात ७ बाद २०८ धावा ठोकल्या. केकेआरकडून आंद्रे रसेलने तुफानी फलंदाजी केली. त्याने अवघ्या २५ चेंडूत नाबाद ६४ धावा ठोकल्या. रसेलने ७ षटकार आणि ४ चौकार ठोकले.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. त्यांचे अवघ्या ५१ धावांत ४ फलंदाज तंबूत परतले होते. सलामीवीर सुनील नरेन (२) धावबाद झाला, तर व्यंकटेश अय्यर (७) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (०) यांना टी. नटराजनने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर उपकर्णधार नितीश राणा फिरकीपटू मयंक मार्कंडेयचा बळी ठरला.

५१ धावांवर ४ विकेट पडल्यानंतर दुसरा सलामीवीर फिल सॉल्ट आणि रमणदीप सिंग यांच्यात ५४ धावांची तुफानी भागीदारी झाली. या भागीदारीने केकेआरला गती दिली. सॉल्टने ४० चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या. तर रमणदीपने १७ चेंडूत ३५ धावांची खेळी खेळली, ज्यात ४ षटकार आणि एक चौकार होता.

यानंतर शेवटी आंद्रे रसेलने सुत्रे हाती घेत चौकार षटकारांचा पाऊस पाडला. केकेआरने शेवटच्या ५ षटकात ८५ धावा ठोकल्या. रसेल आणि रिंकू सिंग यांच्यात सातव्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी झाली.

केकेआरचा मालक शाहरूख खानहादेखील आपल्या संघाचा पहिला सामना पाहण्यासाठी ईडन गार्डन्सवर उपस्थित आहे.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अब्दुल समद, शाहबाज अहमद, मार्को यानसेन, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी नटराजन.

कोलकाता नाइट रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर (कर्णदार), नितीश राणा, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरेन, मिचेल स्टार्क, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

Whats_app_banner

संबंधित बातम्या