KKR Vs SRH Match Scorecard : आयपीएल २०२४ चा तिसरा सामना आज (२३ मार्च) कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळला गेला. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा शेवटच्या चेंडूवर पराभव झाला.
हैदराबादला शेवटच्या षटकात १३ धावांची गरज होती. पण केकेआरच्या हर्षित राणाने शानदार गोलंदाजी केली, हैदराबादच्या फलंदाजांना शेवटच्या ६ चेंडूत केवळ ८ धावा करता आल्या आणि कोलकाता नाईट रायडर्सने ४ धावांनी विजय मिळवला.
सनरायझर्स हैदराबादकडून हेनरिक क्लासेनने २९ चेंडूत ६३ धावा केल्या. मात्र तो आपल्या संघाला पराभवापासून वाचवू शकला नाही. क्लासेन शेवटच्या षटकातील पाचव्या चेंडूवर झेलबाद झाला.
सनरायझर्स हैदराबादला शेवटच्या षटकात विजयासाठी 13 धावा करायच्या होत्या. हर्षित राणाच्या त्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर क्लासेनने षटकार ठोकला. त्यानंतर पुढच्या चेंडूवर १ धाव आली. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर हर्षितने शाहबाज अहमदला बाद केले.
आता हैदराबादला ३ चेंडूत ६ धावा करायच्या होत्या. चौथ्या चेंडूवर मार्को यान्सेनने सिंगल घेत क्लासेनला स्ट्राईक दिली. पाचव्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात क्लासेन सुयश शर्माच्या हाती झेलबाद झाला. आता शेवटच्या चेंडूवर ५ धावा करायच्या होत्या, पण कमिन्सला एकही धाव करता आली नाही.
तत्पूर्वी, केकेआरने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ९ गडी गमावून २०८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात पॅट कमिन्सच्या संघाला २० षटकांत ७ गडी गमावून २०४ धावाच करता आल्या. कोलकाताने या स्पर्धेतील आपल्या मोहिमेला विजयाने सुरुवात केली. आता संघाचा सामना २९ मार्चला बेंगळुरूमध्ये आरसीबीशी होणार आहे.
केकेआरकडून आंद्रे रसेलने तुफानी फलंदाजी केली. त्याने अवघ्या २५ चेंडूत नाबाद ६४ धावा ठोकल्या. रसेलने ७ षटकार आणि ४ चौकार ठोकले.
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सची सुरुवात अत्यंत खराब झाली. त्यांचे अवघ्या ५१ धावांत ४ फलंदाज तंबूत परतले होते. सलामीवीर सुनील नरेन (२) धावबाद झाला, तर व्यंकटेश अय्यर (७) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (०) यांना टी. नटराजनने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. तर उपकर्णधार नितीश राणा फिरकीपटू मयंक मार्कंडेयचा बळी ठरला.
५१ धावांवर ४ विकेट पडल्यानंतर दुसरा सलामीवीर फिल सॉल्ट आणि रमणदीप सिंग यांच्यात ५४ धावांची तुफानी भागीदारी झाली. या भागीदारीने केकेआरला गती दिली. सॉल्टने ४० चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या. तर रमणदीपने १७ चेंडूत ३५ धावांची खेळी खेळली, ज्यात ४ षटकार आणि एक चौकार होता.
यानंतर शेवटी आंद्रे रसेलने सुत्रे हाती घेत चौकार षटकारांचा पाऊस पाडला. केकेआरने शेवटच्या ५ षटकात ८५ धावा ठोकल्या. रसेल आणि रिंकू सिंग यांच्यात सातव्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी झाली.