आयपीएल २०२४च्या ३६ व्या सामन्यात आज (२१ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी (RCB) होत आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर केकेआरने २० षटकात ६ बाद २२२ धावांचा डोंगर उभारला आहे. आरसीबीला विजयासाठी २२३ धावा करायच्या आहेत.
तत्पूर्वी, फिल सॉल्ट आणि सुनील नरेन या सलामीच्या जोडीने केकेआरला पुन्हा एकदा चांगली सुरुवात करून दिली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी २६ चेंडूत ५६ धावांची भागीदारी केली. यात सर्वाधिक धावा सॉल्टने तुफानी फलंदाजी करताना केल्या. सॉल्टने लॉकी फर्ग्युसनच्या एकाच षटकातून २८ धावा केल्या, मात्र मोहम्मद सिराजने सॉल्टला बाद करून अर्धशतक झळकावण्यापासून रोखले.
यानंतर केकेआरचा डाव फसला आणि संघाने ९७ धावांत ४ विकेट गमावल्या. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरने संयमी खेळी करत या मोसमातील पहिले अर्धशतक झळकावले, पण अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने त्याची विकेटही गमावली.
शेवटी, रमणदीप सिंगच्या वेगवान खेळीमुळे केकेआरचा संघ आरसीबीसमोर मजबूत लक्ष्य ठेवण्यात यशस्वी ठरला. रमणदीपने ९ चेंडूंत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद २४ धावा केल्या. आंद्रे रसेलने दुसऱ्या टोकाकडून रमणदीपला चांगली साथ दिली आणि रसेल २० चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने २७ धावा करून नाबाद पॅव्हेलियनमध्ये परतला. आरसीबीकडून कॅमेरून ग्रीन आणि यश दयाल यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
कोलकाता नाईट रायडर्स : फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनीर नरेन, अंगक्रिश रघुवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.
इम्पॅक्ट सब: सुयश शर्मा, अनुकुल रॉय, मनीष पांडे, वैभव अरोरा, रहमानउल्ला गुरबाज.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, विल जॅक, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल, मोहम्मद सिराज.
इम्पॅक्ट सब: सुयश प्रभुदेसाई, अनुज रावत, हिमांशू शर्मा, विजयकुमार विशाक, स्वप्नील सिंग.