T10 League video : कायरन पोलार्डच्या अतरंगी शॉटची क्रिकेट विश्वात चर्चा, तुम्ही पाहिला का?
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  T10 League video : कायरन पोलार्डच्या अतरंगी शॉटची क्रिकेट विश्वात चर्चा, तुम्ही पाहिला का?

T10 League video : कायरन पोलार्डच्या अतरंगी शॉटची क्रिकेट विश्वात चर्चा, तुम्ही पाहिला का?

HT Marathi Desk HT Marathi
Nov 28, 2024 11:01 AM IST

Kieron Pollard video : वेस्ट इंडीजचा माजी क्रिकेटपटू कायरन पोलार्डने टी-१० लीगमध्ये विचित्र शॉट खेळून सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

कायरन पोलार्ड
कायरन पोलार्ड (X)

T10 League news : क्रिकेटच्या मैदानावर फलंदाज अनेकदा धावा काढण्याचे नवनवे मार्ग शोधत असतात. टी-२० आणि टी-१० सारखे वेगवान फॉरमॅट आल्यापासून यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू कायरन पोलार्ड यानं टी-१० लीगदरम्यान खेळलेला एक विचित्र शॉट सध्या प्रचंड चर्चेत आहे. त्याचा हा फटका पाहून सगळ्यांनीच तोंडात बोटं घातली.

टी-१० लीगच्या २४ व्या सामन्यात कायरन पोलार्डच्या नेतृत्वाखालील न्यूयॉर्क स्ट्रायकर्सचा सामना यूपी नवाबशी झाला होता. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना न्यूयॉर्क संघाला २० षटकांत ६ गडी गमावून ७४ धावांपर्यंत मजल मारता आली. यावेळी कर्णधार कायरन पोलार्ड धावा करण्यासाठी धडपडताना दिसला. पोलार्डनं २१ चेंडूत एकही षटकार आणि चौकार न मारता केवळ १२ धावा केल्या आणि तो शेवटपर्यंत नाबाद राहिला.

धावा करता न आल्याच्या या नैराश्यात पोलार्डनं त्याच्याच देशाच्या ओडियन स्मिथच्या शेवटच्या षटकात हा विचित्र शॉट खेळण्याचा प्रयत्न केला.

नेमकं काय केलं?

पोलार्ड सुरुवातीला नेहमीच्या पद्धतीनं उभा होता. गोलंदाज स्मिथ चेंडू फेकणार तोच पोलार्डनं ऑफ साईडला गेला उडी मारली आणि तो विकेटच्या मागे गेला. त्यानं बॅट जोरात फिरवली पण त्याला चेंडू आणि बॅटचा सामना झालाच नाही. या षटकात पोलार्डनं ५ चेंडू निर्धाव घालवले आणि शेवटच्या चेंडूवर एकच धाव घेतली. पोलार्डच्या या शॉटमध्ये त्याची निराशा स्पष्ट दिसत होती.

या निराशाजनक कामगिरीनंतर कायरन पोलार्डच्या संघाला या सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं. यूपी नवाबनं ७५ धावांचं हे लक्ष्य अवघ्या ६.१ षटकांत केवळ १ गडी गमावून पूर्ण केलं.

Whats_app_banner
विभाग