CPL 2024 : वय म्हणजे फक्त आकडा असतो… १९ चेंडूंत वादळी अर्धशतक ठोकून कायरन पोलार्डनं पुन्हा जिंकलं!-kieron pollard smashes a 19 ball fifty to lead trinbago knight riders to victory over st lucia kings in cpl 2024 ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  CPL 2024 : वय म्हणजे फक्त आकडा असतो… १९ चेंडूंत वादळी अर्धशतक ठोकून कायरन पोलार्डनं पुन्हा जिंकलं!

CPL 2024 : वय म्हणजे फक्त आकडा असतो… १९ चेंडूंत वादळी अर्धशतक ठोकून कायरन पोलार्डनं पुन्हा जिंकलं!

Sep 11, 2024 11:37 AM IST

kieron pollard Fifty in CPL 2024 : कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये कायरन पोलार्ड नावाचं वादळ पुन्हा घोंगावलं आहे. या वादळानं प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजीच्या अक्षरश: चिंधड्या उडवल्या.

वय म्हणजे फक्त आकडा असतो… १९ चेंडूंत वादळी अर्धशतक ठोकून पोलार्डनं दाखवून दिलं!
वय म्हणजे फक्त आकडा असतो… १९ चेंडूंत वादळी अर्धशतक ठोकून पोलार्डनं दाखवून दिलं!

CPL 2024 : वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू कायरन पोलार्ड (kieron Pollard) यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी आजही तो व्यावसायिक क्रिकेटचं मैदान गाजवत आहे. वयाची ३७ वर्षे ओलांडल्यानंतरही त्याच्या फलंदाजीतील आक्रमकता कायम आहे. कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये धडाकेबाज अर्धशतक ठोकून त्यानं आपल्या संघाला विजय मिळवून देण्याचं काम केलं आहे.

गेल्या महिन्यात त्याने रशीद खानच्या (Rashid Khan) पाच चेंडूत सलग पाच षटकार ठोकले होते. नुकत्याच झालेल्या सामन्यातही त्यानं अशीच प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरवणारी कामगिरी केली आहे. कायरन पोलार्डनं १९ चेंडूत ५२ धावांची खेळी करत आपल्या नेतृत्वाखालील त्रिनबागो नाईट रायडर्सला सेंट लुसिया किंग्जविरुद्ध विजय मिळवून दिला. 

त्रिनबागो संघाला विजय मिळविणं कठीण असल्याचं सामन्यात एका टप्प्यावर वाटत होतं, पण अशक्य ते शक्य करून दाखवण्याची धमक असलेल्या कायरन पोलार्डनं सामन्याला कलाटणी दिली. त्यानं १९ व्या षटकात ४ षटकार ठोकून सामन्याचा निकालच लावून टाकला. 

त्रिनबागोच्या संघानं १७ षटकांत ६ गडी गमावून १५६ धावा केल्या होत्या. विजयासाठी ३ षटकांत ३२ धावांची गरज होती. १८ व्या षटकात अल्झारी जोसेफनं टिच्चून गोलंदाजी करत फक्त ५ धावा दिल्या. त्यामुळं त्रिनबागो नाईट रायडर्सवर प्रचंड दबाव आला. मात्र, कायरन पोलार्डच्या क्रिकेट कारकिर्दीत असे अनेक प्रसंग आले होते. त्यानं हा दबाव आणि दडपण चेंडूबरोबर सीमेबाहेर भिरकावून दिले. कायरन पोलार्डने १९ व्या षटकात मॅथ्यू फोर्डला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आणि त्या षटकात ४ षटकार ठोकून सामना फिरवून टाकला. शेवटच्या षटकात केवळ ३ धावांची गरज होती. अकील हुसेननं चौकार ठोकून ती जबाबदारी पार पाडली.

पोलार्ड ठरला सामनावीर

कायरन पोलार्डने १९ चेंडूत चौकार न मारता आणि ७ षटकारांच्या मदतीनं नाबाद ५२ धावांची खेळी केली. गोलंदाजी करताना त्यानं एक विकेटही घेतली होती. त्यामुळं त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. 

कशी राहिलीय पोलार्डची आंतरराष्ट्रीय कारकीर्द?

पोलार्डनं टी-२० क्रिकेटमध्ये १३,२०९ धावा केल्या असून गोलंदाज म्हणून त्यानं ३२२ बळी घेतले आहेत. तो टी-२० क्रिकेटमधील सर्वकालीन महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. त्या यादीत ड्वेन ब्राव्होच्या नावाचाही समावेश आहे.

Whats_app_banner
विभाग