द हंड्रेड लीग मध्ये आज (१० ऑगस्ट) सदर्न ब्रेव्ह आणि ट्रेंट रॉकेट्स हे संघ आमनेसामने होते. या सामन्यात सदर्न ब्रेव्हने ट्रेंट रॉकेट्सचा २ गडी राखून पराभव केला. कायरन पोलार्ड हा सदर्न ब्रेव्हच्या विजयाचा हिरो ठरला.
पोलार्डने २३ चेंडूत ४५ धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत २ चौकार आणि ५ षटकार मारले.
यादरम्यान किरोन पोलार्डने राशिद खानच्या गोलंदाजीवर सलग ५ चेंडूत ५ षटकार ठोकले. किरॉन पोलार्डने डावाच्या ८१व्या, ८२व्या, ८३व्या, ८४व्या आणि ८५व्या चेंडूवर सलग षटकार ठोकले. यानंतर आता, किरॉन पोलार्ड सोशल मीडियावर तुफान ट्रेंड करत आहे.
किरॉन पोलार्ड जेव्हा सलग षटकार मारत होता तेव्हा बॉलर रशीद खान आणि ट्रेंट रॉकेट्सचे खेळाडू असहाय्य दिसत होते. सदर्न ब्रेव्हसमोर केवळ १२७ धावांचे लक्ष्य असले तरी ट्रेंट रॉकेट्सच्या गोलंदाजांनी नेत्रदीपक गोलंदाजी केली होती. त्यामुळे सदर्न ब्रेव्हला १२७ धावा करण्यासाठी ९९ चेंडू खेळावे लागले.
फलंदाजीला येण्यापूर्वी ट्रेंट रॉकेट्सने १०० चेंडूत ८ गडी बाद १२६ धावा केल्या होत्या. ट्रेंट रॉकेट्ससाठी यष्टिरक्षक फलंदाज टॉम बेंटनने १७ चेंडूत सर्वाधिक ३० धावा केल्या. याशिवाय ॲडम लिथ, जो रूट, रोव्हमन पॉवेल आणि लुईस ग्रेगरी या फलंदाजांनी उपयुक्त योगदान दिले.
ट्रेंट रॉकेट्सच्या १२६ धावांना प्रत्युत्तर देताना सदर्न ब्रेव्हने केवळ १ चेंडू राखून लक्ष्य गाठले. सदर्न ब्रेव्हकडून किरॉन पोलार्डने २३ चेंडूत ४५ धावांची सर्वोच्च खेळी खेळली. त्याने आपल्या खेळीत २ चौकार आणि ५ षटकार मारले. पोलार्डच्या सलग ५ षटकारांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.