Kevin Pietersen Jay Shree Ram : अनेक वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर सोमवारी (२२ जानेवारी) अयोध्येत श्री रामांची प्रतिष्ठापणा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी या ऐतिहासिक सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. राम प्रतिष्ठापण सोहळ्यासाठी देश-विदेशातील अनेक दिग्गज लोक अयोध्येत उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी सचिन तेंडुलकर आणि अनिल कुंबळेसह अनेक भारतीय क्रिकेटपटूंनीही हजेरी लावली होती.
पण आता, इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू केविन पीटरसन हादेखील भगवान रामाच्या भक्तीत तल्लीन झाला आहे. पीटरसनने श्री राम प्रतिष्ठापणेच्या भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने हिंदी भाषेत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
पीटरसनने एक्सवर हिंदी भाषेत 'जय श्री राम' असे लिहिले आहे. पीटरसनच्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. तसेच, अनेक मजेशीर मीम्सदेखील बनत आहेत.
यापूर्वी राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरनेही सोशल मीडियाच्या माध्यमातून भगवान रामावर पोस्ट लिहून भारतीय चाहत्यांची मने जिंकली होती.
दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका २५ जानेवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ जबरदस्त तयारी करत आहेत.
या मालिकेआधी केविन पीटरसने भारतीय खेळाडूंवर शाब्दिक हल्ला चढवला होता. त्याने भारतीय पीचेसवर टीका केली होती. तसेच, पीटरसनने रविंद्र जडेजा आणि आर अश्विन यांना कसे खेळायचे याचा गुरूमंत्रदेखील इंग्लिश फलंदाजांना दिला होता.
भारत आणि इंग्लंड कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची अलीकडच्या काळातील कामगिरी खूपच चांगलीच झाली आहे. तर बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंड १२ वर्षांपासून भारतात कसोटी मालिका जिंकू शकलेला नाही. यामुळे हा १२ वर्षांचा दुष्काळ संपवण्याच्या इराद्याने इंग्लंड मैदानात उतरणार आहे.