Kevin Pietersen On Ind vs Eng Test : भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका २५ जानेवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाने तयारी सुरू केली आहे. पण मालिकेपूर्वीच इंग्लंडच्या आजा-माजी खेळाडूंनी टीम इंडियावर शाब्दिक हल्ला सुरू केला आहे.
वास्तविक, इंग्लंडचा माजी फलंदाज केविन पीटरसन याने फिरकीपटू रवींद्र जडेजाला कसे खेळायचे, याचा मंत्र इंग्लिश फलंदाजांना दिला आहे. जडेजा काही मुरलीधरन किंवा शेन वॉर्न नाही, टेक्निक बरोबर असेल तर तुम्हाला त्याच्यापासून धोका नाही, असे त्याने म्हटले आहे.
एका मुलाखतीत पीटरसन म्हणाला, की ‘मी जडेजाच्या गोलंदाजीवर खेळलो आहे. विषय आपल्या टेक्निकचा आहे. जडेजा मुरलीधरन किंवा शेन वॉर्न नाही. तो डावखुरा फिरकी गोलंदाज आहे, जो बहुतेक एकाच बाजूने गोलंदाजी करतो. कधीकधी त्याचा चेंडू स्कीट करतो. निसरड्या चेंडूंना खेळण्यासाठी तुमची टेक्निक चांगली असावी लागते. जर ती असेल, तर तुम्हाला जडेजाविरुद्ध कोणतीही अडचण येणार नाही. तसेच, तुमचे पाय योग्य ठिकाणी असतील, तुम्ही पुढच्या पायावर खेळत नसाल, तुम्ही चेंडूच्या दिशेने मागे राहून उशीरा खेळत असाल तर तुम्ही सुरक्षित राहाल. फक्त बोल्ड किंवा एलबीडब्ल्यू होणार नाही याची काळजी घ्या.
पीटरसन पुढे म्हणाला, की ‘तुम्ही त्याचे चेंडू स्लिपच्या दिशेने खेळत असलात तरी काही हरकत नाही. त्याच्या चेंडूच्या लाईनचा आणि लेंथचा अंदाज लावण्यासाठी आपल्याकडे पुरेसा वेळ आहे. तुम्हाला फक्त बोल्ड होणं आणि पायचीत होण्यापासून वाचावं लागेल’.
पीटरसनने या मुलाखतीत आर अश्विनचाही उल्लेख केला. जुन्या कसोटी मालिकेची आठवण करून देताना तो म्हणाला की अश्विन कोणता चेंडू टाकणार आहे हे मला समजायचे. मी अश्विनचे 'दुसरा' चेंडूवर ऑफ साइडला खूप मारायचो हे सगळ्यांनी पाहिलं असेल, असंही पीटरसन म्हणाला.