केविन पीटरसन हा इंग्लंड क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वादग्रस्त खेळाडूंपैकी एक आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डासोबत (ECB) बिघडलेल्या संबंधांमुळे त्याला त्याच्या करिअरमधील सर्वोत्तम फॉर्मात असताना निवृत्ती घ्यावी लागली. २०१२ या वर्षात त्याच्या कारकिर्दीत मोठी घटना घडली. पीटरसनवर विरोधी संघाला मदत केल्याचा आरोप झाला होता.
वास्तविक, २०१२ साली दक्षिण आफ्रिकेचा संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर होता आणि त्यांच्यामध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली. या मालिकेत पीटरसनने इंग्लंडचा कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉस याला कसे बाद केले जाऊ शकते, हे टेक्स्ट मेसेजद्वारे दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सांगितल्याचा आरोप करण्यात आला होता. पीटरसनने एका मुलाखतीदरम्यान हे आरोप मान्य केले आणि इंग्लंडचा तत्कालीन कर्णधार अँड्र्यू स्ट्रॉसची माफीही मागितली होती.
पीटरसनच्या मेसेजचा स्ट्रॉसच्या फॉर्मवर मोठा प्रभाव पडला कारण स्ट्रॉसला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील ६ डावात १७.८३ च्या सरासरीने केवळ १०७ धावा करता आल्या. त्याच्या फॉर्ममधील ही घसरण धक्कादायक होती कारण याच्या केवळ एक महिन्यापूर्वी त्याने ३ सामन्यांच्या ५ डावांमध्ये २ शतकांसह ३२६ धावा केल्या होत्या.
त्यावेळी पीटरसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात १४९ धावांची उत्कृष्ट खेळी केली होती. पीटरसन इतका जबरदस्त फॉर्ममध्ये होता की त्याने डेल स्टेन आणि मॉर्ने मॉर्केल यांची जबरदस्त धुलाई केली होती. पण असे असूनही त्याला पुढील सामन्यातून वगळण्यात आले आणि त्याचे ईसीबीसोबतचे संबंध बिघडू लागले.
यानंतर पीटरसनने आणखी काही मालिका खेळल्या आणि शेवटी २०१४ मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळल्यानंतर त्याने निवृत्तीची घोषणा केली. केव्हीन पीटरसनने इंग्लंडसाठी १०४ कसोटी सामने खेळले, ज्यात त्याने २३ शतकांसह ८,१८१ धावा केल्या. दुसरीकडे, त्याने १३६ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४,४४० धावा केल्या. पीटरसनमध्ये प्रतिभेची कधीही कमतरता नव्हती कारण कसोटीतील यशानंतर त्याने टी-20 क्रिकेटमध्येही स्वत:ला चांगले जुळवून घेतले. त्याने ३७ टी-20 सामन्यांमध्ये ३८ च्या सरासरीने १,१७६ धावा केल्या.