Keshav Maharaj video On Ram Mandir Pran Pratishtha : सध्या संपूर्ण भारत देश राममय झाला आहे. उद्या (२२ जानेवारी) अयोध्येतील राम मंदिरात रामाच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा होणार आहे. रामलल्लाच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लोक अयोध्येत पोहोचत आहेत.
श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम सोमवारी दुपारी १२.२० वाजता सुरू होईल. मात्र त्यापूर्वीच देशभरातून रामभक्त अयोध्येत पोहोचत आहेत. या कार्यक्रमासाठी अनेक क्रिकेटर्सही अयोध्येला पोहोचले आहेत.
दरम्यान, आता दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू केशव महाराज याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओतून केशव महाराजने अयोध्येतील राम मंदिराच्या 'प्राण प्रतिष्ठे'साठी आफ्रिकेतील भारतीय समुदायाला हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
केशव महाराज याने राम मंदिराच्या भव्य उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला एक व्हिडिओ पोस्ट करून भारतीयांचे अभिनंदन केले. आफ्रिकेचा केशव महाराज प्रभु रामाचा आणि हनुमानाचा कट्टर भक्त आहे.
केशव महाराज आपल्या व्हिडीओत म्हणाला, की सर्वांना नमस्कार. उद्या अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी मी दक्षिण आफ्रिकेतील भारतीय समुदायाला माझ्या शुभेच्छा देऊ इच्छितो. सर्वांना शांती, सौहार्द आणि आध्यात्मिक ज्ञान लाभो. जय श्री राम'.
क्रिकेट सामन्यात केशव महाराजच्या प्रत्येकी एन्ट्रीवर राम सिया राम हे गाणं वाजवलं जातं. नुकतीच भारत आणि आफ्रिका क्रिकेट मालिका खेळली गेली. त्या मालिकेत सर्वांनी हा प्रसंग पाहिला. केशव महाराज जेव्हा फलंदाजीला मैदानात येतो तेव्हा डीचे राम सिया राम हे गाणं वाजवतो. तसेच, केशव महाराज गोलंदाजीला आल्यावर देखील हेच गाणे वाजवले जाते. एवढेच नाही तर केशवच्या बॅटवर ओमचे स्टिकरदेखील आहे.
राम मंदिराच्या भव्य सोहळ्याला ६ हजारांहून अधिक पाहुणे उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. सचिन तेंडुलकर, विराट कोहली, एमएस धोनी, हरभजन सिंग, रविचंद्रन अश्विन, अनिल कुंबळे आणि हरमनप्रीत कौर या प्रसिद्ध क्रिकेटपटूंना या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.