भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी अष्टपैलू खेळाडू केदार जाधवने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. केदार जाधवने निवृत्तीची घोषणा करून चाहत्यांना चकित केले आहे. केदार जाधवने अचानक निवृत्तीचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे त्याने माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीच्या स्टाईलमध्ये क्रिकेटला अलविदा केला आहे. केदार जाधवने फेब्रुवारी २०२० मध्ये टीम इंडियासाठी शेवटचा सामना खेळला होता.
केदार जाधवने भारतासाठी ७३ एकदिवसीय आणि ९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये जाधवने ४२.०९ च्या सरासरीने आणि १०१.६१ च्या स्ट्राईक रेटने १३८९ धावा केल्या. यासोबतच त्याने २७ विकेट्सही घेतल्या.
जाधव एकेकाळी टीम इंडियाचा सर्वोत्तम फिनिशर ठरला होता. त्याने इंग्लंडविरुद्ध शतक झळकावून भारताला गमावलेला सामना जिंकून दिला होता. आंतरराष्ट्रीय T20 मध्ये त्याच्या नावावर १२२ धावा होत्या. केदारने भारताकडून शेवटचा सामना ८ फेब्रुवारी २०२० रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता.
केदार जाधवची सर्वात प्रभावी आंतरराष्ट्रीय खेळी म्हणजे त्याने केवळ पुणे येथे ७६ चेंडूत १२० धावांची खेळी केली होती. इंग्लंडच्या ३५२ धावांचा पाठलाग करताना आणि भारत अडचणीत असताना केदारने विराट कोहलीसोबत २०० धावांची दमदार भागिदारी केली आणि संघाला विजय मिळवून दिला.
केदार जाधवने २०१९ चा वनडे वर्ल्डकपदेखली खेळला आहे. त्याने या वर्ल्डकपमधील ५ डावात ८० धावा केल्या. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात ५२ धावांची इनिंग खेळली होती.
३९ वर्षीय केदार जाधवने सोमवारी (३ जून) सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून निवृत्तीची घोषणा केली. केदार जाधवने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "माझ्या संपूर्ण कारकिर्दीत प्रेम आणि पाठिंबा दिल्याबद्दल सर्वांचे आभार. ३ वाजल्यापासून मी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्त झाल्याचे मानले जाईल."
केदार जाधवनेही इन्स्टाग्रामवर एक पोस्ट टाकली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहिले की, १५:00 वाजल्यापासून मला क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्त समजले जावे. त्याने त्याच्या कारकिर्दीतील काही फोटोही शेअर केले आहेत. त्याच्या इन्स्टा पोस्टच्या पार्श्वभूमीवर 'जिंदगी के सफर में...' हे गाणे वाजत असून, त्याच्या पोस्टने चाहत्यांना महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीची आठवण करून दिली आहे.
धोनीनेही १५ ऑगस्ट २०२० रोजी अशाच प्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.
जाधव २०१३-१४ च्या रणजी करंडक स्पर्धेत ८७.३५ च्या सरासरीने १२२३ धावा करून मोसमातील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. यात ६ अर्धशतके आणि २ शतकांचा समावेश होता. त्याने २०४ धावांची सर्वोत्तम खेळी केली होती. जाधवच्या त्या फॉर्ममुळे महाराष्ट्राने अंतिम फेरी गाठली होती. पण तिथे त्यांना कर्नाटककडून पराभव पत्करावा लागला.
जाधवने ९३ आयपीएल सामने खेळताना ११९६ धावा केल्या. तो दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद, कोची टस्कर्स केरळा, चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघासाठी खेळला आहे.
संबंधित बातम्या