महाराजा टी-20 ट्रॉफीमध्ये म्हैसूर वॉरियर्सने मंगलोर ड्रॅगन्सचा २७ धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात म्हैसूर वॉरियर्सचा कर्णधार करुण नायरने चमकदार कामगिरी केली. त्याने तुफानी फलंदाजी करत उत्कृष्ट शतक झळकावले. त्याने जवळपास २६० च्या स्ट्राइक रेटने धावा फटकावल्या. करुण नायरमुळेच संघाला सामना जिंकण्यात यश आले आहे.
या सामन्यात करुण तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याने केवळ ४८ चेंडूत १३ चौकार आणि ९ षटकारांसह १२४ धावा केल्या. त्याच्यामुळेच म्हैसूर वॉरियर्स संघाला २० षटकात २२६ धावा करता आल्या. करुण आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांची मने जिंकण्यात यशस्वी ठरला. त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला.
२०१६ मध्ये करुण नायरने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्रिशतक झळकावले होते. त्यावेळी त्याने भारतीय संघासाठी ३८१ चेंडूत ३०३ धावा केल्या होत्या. टीम इंडियासाठी कसोटीत त्रिशतक झळकावणारा तो केवळ दुसरा फलंदाज आहे. त्याच्या आधी भारताच्या वीरेंद्र सेहवागने कसोटीत २ त्रिशतके झळकावली होती.
करुण नायरला गेल्या ७ वर्षांपासून टीम इंडियात संधी मिळालेली नाही. त्याने २०१७ मध्ये भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. नायरने आतापर्यंत ७ कसोटी सामन्यांमध्ये ३७४ धावा केल्या आहेत. त्याने टीम इंडियासाठी २ एकदिवसीय सामने देखील खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ४६ धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे करुण नायरने अद्याप टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून पदार्पण केलेले नाही.