Mayank Agarwal Health update : भारताचा कसोटीपटू व कर्नाटक संघाचा कर्णधार मयंक अग्रवाल याची प्रकृती अचानक बिघडल्यामुळं त्याला आगरतळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांच्या तपासणीनंतर त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्याचं कारण समोर आलं आहे.
मयंक अगरवाल हा रणजी सामना खेळून त्रिपुराहून दिल्लीला विमानानं निघाला होता. विमानात बसल्यावर तहान लागली म्हणून त्यानं समोरच्या सीटच्या मागील बाजूस असलेल्या पॅकेटमधील बॉटल काढली आणि पाणी समजून ते तो प्यायला. हे पाणी प्यायल्यानंतर मयांकची प्रकृती बिघडली. त्याच्या घशात जळजळ व्हायला लागली. तो लगेचच वॉशरूमध्ये गेले आणि तिथं उलटी केली. त्यानंतर चूळही भरली. तरीही त्याला अस्वस्थ वाटत होतं. त्याची जीभ जड झाली आणि चेहरा लालसर पडला.
हा प्रकार गंभीर असल्याचं लक्षात येताच टेक ऑफ घेत असलेलं विमान थांबवण्यात आलं. तो लगेचच खाली उतरला आणि आगरतळा रुग्णालयात पोहोचला. तिथं डॉक्टरांनी त्याची तपासणी केली. आता तो आयएलएस रुग्णालयात असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं.
या प्रकरणी मयंक अग्रवालच्या मॅनेजरनं पोलीस तक्रार दाखल केली असून चौकशी सुरू आहे. त्रिपुराचे आरोग्य सचिव किरण गित्ते यांनीही याविषयी माहिती दिली. पोलिसांनी मयंकची तक्रार दाखल करून घेतली असून नेमकं काय घडलं याचा तपास करू आहे. मयंकच्या उपचाराची पूर्ण काळजी सरकार घेईल. उद्या मयंक बेंगळुरूला परतणार असल्याचं त्याच्या मॅनेजरनं सांगितलं.
मयंक अग्रवालनं अलीकडंच २६ ते २९ जानेवारी दरम्यान आगरतळा इथं त्रिपुरा विरुद्ध सामना खेळला. त्यानं ५१ आणि १७ धावांची खेळी केली. कर्नाटकनं हा सामना २९ धावांनी जिंकला.
मयंक सध्या भारतीय संघाबाहेर आहे. त्यानं ५ फेब्रुवारी २०२० रोजी हॅमिल्टन एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा सामना खेळला. आत्तापर्यंत त्यानं भारतीय संघासाठी २१ कसोटी आणि ५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यांत त्यानं ४ शतकांच्या मदतीनं १४८८ धावा केल्या आहेत. तर एकदिवसीय सामन्यात ८६ धावा केल्या आहेत.