Mumbai vs Karnataka Vijay Hazare Trophy : विजय हजारे ट्रॉफी २०२४-२५ मध्ये इतिहास घडला आहे. मयंक अग्रवालच्या कर्नाटक संघाने या स्पर्धेतील सर्वात मोठे रनचेस करून दाखवले आहे. कर्नाटकाने मुंबईचे ३८३ धावांचे लक्ष्या ४६ षटकात पूर्ण केले. विजय हजारे ट्रॉफीचा हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ५० षटकात ४ बाद ३८२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात कर्नाटकाने ४६.२ षटकात ३८३ धावा करत सामना जिंकला.
मुंबईकडून कर्णधार श्रेयस अय्यर याने ५५ चेंडूत ११४ धावा आणि शिवम दुबे याने ३६ चेंडूत ६३ धावा केल्या. प्रत्युत्तरात कर्नाटककडून केव्ही अनिश याने ८२ धावा केल्या. तर कृष्णन श्रीजीत याने शानदार शतक आणि प्रवीण दुबेने अर्धशतक झळकावले. या फलंदाजांच्या बळावरच कर्नाटकने ३८२ धावांचे लक्ष्य गाठले. विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासातील हे सर्वात मोठे रनचेस आहे.
प्रथम फलंदाजीस आलेल्या मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही. चौथ्या षटकातच सलामीवीर रघुवंशी १७ चेंडूत केवळ ६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर आयुष म्हात्रेने हार्दिक तोमोरच्या साथीने धावसंख्या ३० षटकांत १४८ पर्यंत नेली. आयुषने ८२ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७८ धावा केल्या.
यानंतर क्रीजवर आलेल्या श्रेयस अय्यरने पहिल्याच चेंडूपासून आक्रमण केले. हार्दिक ९४ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८४ धावा करून बाद झाला तेव्हा श्रेयसने ५५ चेंडूत ५ चौकार आणि १० षटकारांच्या मदतीने ११४ धावा केल्या.
यानंतर सूर्यकुमार यादवने २० आणि शिवम दुबेने ३६ चेंडूत ५ चौकार आणि ५ षटकारांसह ६३ धावा करत मुंबईची धावसंख्या ५० षटकांत ४ गडी बाद ३८२ पर्यंत नेली.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कर्नाटक संघाची दमदार सुरुवात झाली. सलामीवीर निकीन जोस १३ चेंडूत २१ धावा करून जुनैद खानच्या गोलंदाजीवर बाद झाला. यानंतर मयंक आगवाल आणि केव्ही अनिशने स्कोअर पुढे नेला. मयंकने ४८ चेंडूत ४७ धावा केल्या.
मयंक आऊट होताच श्रीजीत क्रीजवर आला. त्याने अनिशसोबत भागीदारी केली. अनिश ६६ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८२ धावा करून बाद झाला. मात्र श्रीजीतने वादळी फलंदाजी करत आपले शतक पूर्ण केले. श्रीजतने १०१ चेंडूत २० चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद १५० धावा केल्या. तर प्रवीण दुबेनेही ५० चेंडूत ६५ धावा करत संघाला ४६.२ षटकांत विजय मिळवून दिला.
संबंधित बातम्या