क्रिकेट वर्ल्डकपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा धुव्वा उडवला. या पराभवानंतर टीम इंडियाचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळाले.अंतिम सामना हरल्यानंतर कर्णधार रोहित शर्मासह टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंच्या डोळ्यात अश्रू तरळले.
भारताच्या ड्रेसिंग रूममध्येही पूर्ण शांतता होती. दरम्यान, देशाला पहिला विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार कपिल देव यांनी टीम इंडियाला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. या पराभवातून खेळाडूंनी आता पुढे जाण्याची गरज असल्याचे कपिल देवचे यांचे म्हणणे आहे.
पत्रकारांशी बोलताना कपिल देव यांनी खेळाडूंना महत्त्वाचा सल्ला दिला. ते म्हणाले की, "एखाद्या खेळाडूला पुढे जावे लागते. या पराभवाचे ओझे तुम्ही आयुष्यभर सोबत घेऊ जावू शकत नाही. जे झाले ते बदलता येत नाही. मेहनत करत राहा." हीच एका खेळाडूची खासियत आहे."
कपिल देव पुढे म्हणाले की, "भारतीय संघाने खूप चांगले क्रिकेट खेळले. होय, ते फायनल जिंकू शकले नाहीत. एका खेळाडूला समजले पाहिजे की आपण आपल्या चुकांमधून काय शिकू शकतो.'
विशेष म्हणजे टीम इंडियाने या स्पर्धेत सलग १० विजय नोंदवल्यानंतर विजेतेपदाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाकडून ६ विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अंतिम सामन्यात फलंदाज आणि गोलंदाज काहीही कमाल दाखवू शकले नाहीत. प्रथम फलंदाजी करताना संपूर्ण भारतीय संघ २४० धावा करून सर्वबाद झाला. संघाकडून केएल राहुलने सर्वाधिक ६६ धावा केल्या, तर विराट कोहलीने ५४ धावा केल्या. मात्र, हे दोघे वगळता संघाच्या इतर फलंदाजांनी आपल्या कामगिरीने कमालीची निराशा केली.
ऑस्ट्रेलियाने २४१ धावांचे लक्ष्य अवघ्या ४३ षटकांत ४ गडी गमावून पूर्ण केले. संघाच्या वतीने ट्रॅव्हिस हेडने शानदार फलंदाजी करत शतक झळकावले आणि १३७ धावा केल्या. त्याचवेळी मार्नस लॅबुशेनही अर्धशतक झळकावून नाबाद परतला.