Kane Williamson ODI Stats : केन विल्यमसन याची गणना टी-20 फॉरमॅटमधील तगड्या फलंदाजांमध्ये होऊ शकत नाही. पण एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटचा विचार केला तर तो खूपच महान फलंदाज आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीच केन विल्यमसन याने आपण या मोठ्या स्पर्धेसाठी तयार असल्याचे दाखवून दिले आहे.
वास्तविक, पाकिस्तानमध्ये सध्या तिरंगी मालिका खेळली जात आहे. यामध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ सामील आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळला गेला.
या सामन्यात केन विल्यमसन याने तुफानी शतक झळकावले आहे. त्याने अवघ्या ७२ चेंडूत शतक ठोकले. त्याच्या या खेळीच्या बळावर न्यूझीलंडने आफ्रिकेचे ३०५ धावांचे लक्ष्य ४८.४ षटकात पूर्ण केले.
दरम्यान, केन विल्यमसन इतका जबरदस्त फॉर्ममध्ये आहे की त्याने ८ एकदिवसीय डावांमध्ये ५५० हून अधिक धावा केल्या आहेत.
केन विल्यमसनचे एकदिवसीय क्रिकेटमधील हे आकडे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये न्यूझीलंडला कुणीही हलक्यात घेऊ नये, असे स्पष्टपणे सांगत आहेत. विल्यमसनने मागील ८ एकदिवसीय डावांमध्ये त्याने ५५० हून अधिक धावा केल्या आहेत, ज्यात १ शतक आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे. गेल्या ८ डावात विल्यमसनने ५० पेक्षा कमी धावा केल्याचा एकच प्रसंग आला आहे.
आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की केन विल्यमसन शेवटच्या २१ एकदिवसीय डावांपासून शतकाची वाट पाहत होता, परंतु त्याची प्रतीक्षा देखील तिरंगी मालिकेत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात संपली. विल्यमसनच्या वनडे कारकिर्दीतील हे १४ वे शतक आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये केन विल्यमसनने खूप धावा केल्या आहेत. विल्यमसनने आतापर्यंत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ६ डावात ३४५ धावा केल्या आहेत. या आयसीसी स्पर्धेच्या इतिहासात त्याची सरासरी ६९ आहे आणि आतापर्यंत त्याने १ शतक आणि ३ अर्धशतके झळकावली आहेत.
विल्यमसन यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये न्यूझीलंडचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही होऊ शकतो. सध्या हा विक्रम स्टीफन फ्लेमिंगच्या नावावर आहे, ज्याने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात १३ डावात ४४१ धावा केल्या होत्या. विल्यमसनला त्याचा विक्रम मोडण्यासाठी ९७ धावांची गरज आहे.
संबंधित बातम्या