न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विल्यमसन याने इतिहास रचला आहे. सध्या विल्यमसन इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत आहे. या सामन्यातील न्यूझीलंडच्य दुसऱ्या डावात त्याने २६ धावा पूर्ण करताच मोठा पराक्रम केला. केन विल्यमसन याने कसोटी क्रिकेटमध्ये ९००० धावांचा टप्पा गाठला आहे.
न्यूझीलंड क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू ठरला. होय, न्यूझीलंडकडून आजपर्यंत एकाही फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही. विल्यमसननंतर या यादीत माजी फलंदाज रॉस टेलर चा क्रमांक लागतो, ज्याने किवी संघाकडून कसोटीत ७६८४ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडकडून ८ ते ९ हजार धावांचा टप्पा ओलांडणारा विल्यमसन पहिला खेळाडू ठरला आहे.
क्राइस्टचर्चमधील या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात विल्यमसनचे शतक अवघ्या ७ धावांनी हुकले होते, तो ९३ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर बाद झाला. दुसऱ्या डावात त्याने आता अर्धशतक केले.
जागतिक क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर तो ९ हजार धावांचा टप्पा गाठणारा तो १९ वा खेळाडू ठरला आहे. कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे, ज्याने आपल्या कारकिर्दीत १५९२१ धावा केल्या आहेत. सक्रिय क्रिकेटपटूंमध्ये जो रूट हा एकमेव खेळाडू आहे ज्याच्या नावावर १० हजरांपेक्षा जास्त धावा आहेत.
या यादीत सचिन तेंडुलकर, केन विल्यमसन, रिकी पाँटिंग, जॅक कॅलिस, राहुल द्रविड, जो रूट, अॅलिस्टर कुक, कुमार संगकारा, ब्रायन लारा, शिवनारायण चंद्रपॉल, महेला जयवर्धने, अॅलन बॉर्डर, स्टीव्ह वॉ, सुनील गावस्कर, युनूस खान, स्टीव्ह स्मिथ, हाशिम आमला, ग्रॅमी स्मिथ आणि विराट कोहली यांचा समावेश आहे.
फॅब-४ बद्दल बोलायचे झाले तर केन विल्यमसनने शेवटी ९ हजार धावांचा टप्पा गाठण्यात यश मिळवले आहे. जो रूट १२७५४ धावांसह या यादीत पहिल्या स्थानावर आहे. स्टीव्ह स्मिथ दुसऱ्या आणि विराट कोहली तिसऱ्या स्थानावर आहे.
जो रूट - १२७५४ धावा
स्टीव्ह स्मिथ - ९७०२ धावा
विराट कोहली - ९१४५ धावा
केन विल्यमसन - ९०००* धावा
सर्वात जलद ९ हजार धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत केन विल्यमसनने कुमार संगकारा आणि युनूस खान यांची बरोबरी केली आहे. विल्यमसनने १०३ सामन्यांत ही कामगिरी केली असून संयुक्तपणे यादीत तिसऱ्या क्रमांकावर आपले स्थान निर्माण केले आहे. स्टीव्ह स्मिथ ९९ सामन्यांसह अव्वल, तर ब्रायन लारा १०१ सामन्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे.