न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसन याने आपल्या तुफानी फलंदाजीने खळबळ उडवून दिली आहे. पाकिस्तानमध्ये खेळल्या जात असलेल्या त्रिकोणी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात केन विल्यमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अवघ्या ७२ चेंडूत शतक पूर्ण केले.
विल्यमसनचे वनडे फॉरमॅटमधील हे १४ वे शतक आहे. केन विल्यमसनने ५० षटकांच्या सामन्यात आपले दुसरे जलद शतक ठोकले आहे. विल्यमसनच्या या शानदार फलंदाजीमुळे न्यूझीलंड संघाने हा सामना ६ गडी राखून जिंकला.
केन विल्यमसनने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटपर्यंत फलंदाजी करत १३३ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ११३ चेंडूंचा सामना केला, ज्यामध्ये १३ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. इतकेच नाही तर विल्यमसनने डेव्हन कॉनवेसोबत दुसऱ्या विकेटसाठी १८७ धावांची मोठी भागीदारी केली.
ज्यामध्ये कॉनवेने ९७ धावांचे योगदान दिले. या दोघांच्या दमदार खेळाच्या जोरावर न्यूझीलंडने हा सामना सहज जिंकून अंतिम फेरीतील आपला दावा मजबूत केला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करत ३०४ धावांची मोठी धावसंख्या उभारली. दक्षिण आफ्रिकेकडून मॅथ्यू ब्रिट्झकेने १५० धावांची शानदार खेळी केली. मॅथ्यू ब्रिट्झकेचेही वनडेत पदार्पण होते.
मात्र, त्याची ही शानदार खेळी संघाला उपयोगी पडू शकली नाही. मॅथ्यू ब्रिट्झकेशिवाय वियान मुल्डरनेही ६४ धावांचे योगदान दिले. या दोघांशिवाय इतर कोणत्याही खेळाडूला आपली प्रतिभा दाखवता आली नाही.
दक्षिण आफ्रिकेच्या या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना न्यूझीलंड संघाने स्फोटक सुरुवात केली. विल यंग आणि डेव्हन कॉनवे यांच्यात पहिल्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी झाली.
या दोघांच्या भागीदारीशिवाय केन विल्यमसनने दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची अवस्था बिकट झाली. अखेरीस, ग्लेन फिलिप्सने २८ धावांची खेळी खेळली आणि ८ चेंडू बाकी असताना संघाला विजय मिळवून दिला.
संबंधित बातम्या