श्रीलंकेचा नवा युवा स्टार फलंदाज कामिंडू मेंडिस थांबायचे नाव घेत नाहीये. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील अवघ्या १३व्या डावात एक हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या चालू कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात त्याने ही कामगिरी केली आहे.
श्रीलंकेने पहिला डाव ६०२ धावांवर घोषित केला. या सामन्यात मेंडिसने नाबाद १८२ धावा करत इतिहास रचला आहे.
कमिंडू मेंडिसने आता कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद एक हजार धावा करणाऱ्या सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी बरोबरी केली आहे. मेंडिसने आपल्या कारकिर्दीतील १३व्या डावात ही कामगिरी केली आणि डॉन ब्रॅडमन यांनीही आपल्या कसोटी कारकिर्दीत १ हजार धावा पूर्ण करण्यासाठी १३ डाव घेतले होते.
तथापि, सर्वात जलद १ हजार धावा करण्याचा विक्रम संयुक्तपणे इंग्लंडचा हर्बर्ट सटक्लिफ आणि वेस्ट इंडीजचा ईडी वीक्स यांच्या नावावर आहे, ज्यांनी १२ डावात १००० धावा पूर्ण केल्या होतया.
कामिंडू मेंडिसने जुलै २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळून कसोटी पदार्पण केले, ज्यामध्ये त्याने ६१ धावांचे अर्धशतक झळकावले. पण २०२४ मध्ये श्रीलंकेच्या संघात पुनरागमन केल्यानंतर त्याची बॅट शांत होण्याचे नाव घेत नाही. मेंडिसने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत ८ कसोटी सामने खेळले आहेत, ज्यांच्या १३ डावांमध्ये त्याने ५ शतके आणि ४ अर्धशतके झळकावली आहेत.
मेंडिसच्या उत्कृष्ट आकडेवारीवरून असे दिसून येते की तो प्रत्येक ३ डावांपैकी जवळपास २ डावांमध्ये ५० किंवा त्याहून अधिक धावा करतो.
कमिंडू मेंडिस आता कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावा करणारा आशियाई फलंदाज बनला आहे. त्याच्याआधी, भारताच्या विनोद कांबळीने १४ डावांत १००० कसोटी धावा पूर्ण केल्या होत्या आणि आतापर्यंत तो आशियाई फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर होता. पण आता मेंडिसने सर्वात जलद एक हजार कसोटी धावा करणारा आशियाई फलंदाज होण्याचा विक्रम केला आहे.