Kamindu Mendis : श्रीलंकेची नवी रनमशीन! कामिंदू मेंडिसनं अवघ्या सातव्या कसोटीत मोडला गावस्करांचा मोठा विक्रम, वाचा-kamindu mendis breaks sunil gavaskar record most fifties in consecutive test matches ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Kamindu Mendis : श्रीलंकेची नवी रनमशीन! कामिंदू मेंडिसनं अवघ्या सातव्या कसोटीत मोडला गावस्करांचा मोठा विक्रम, वाचा

Kamindu Mendis : श्रीलंकेची नवी रनमशीन! कामिंदू मेंडिसनं अवघ्या सातव्या कसोटीत मोडला गावस्करांचा मोठा विक्रम, वाचा

Sep 19, 2024 04:56 PM IST

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि बांगलादेशमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर आता २५ वर्षीय फलंदाज कामिंडू मेंडिसने न्यूझीलंडला दम दाखवला आहे.

kamindu mendis: कामिंदू मेंडिसनं अवघ्या सातव्या कसोटीत मोडला गावस्करांचा मोठा विक्रम, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडनंतर न्यूझीलंडला दिला दणका
kamindu mendis: कामिंदू मेंडिसनं अवघ्या सातव्या कसोटीत मोडला गावस्करांचा मोठा विक्रम, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडनंतर न्यूझीलंडला दिला दणका (AFP)

श्रीलंकेचा संघ सध्या बदलाच्या टप्प्यातून जात आहे. गेल्या काही वर्षांत पिछाडीवर पडलेल्या श्रीलंका क्रिकेट संघाचे भवितव्य आता उज्ज्वल दिसत आहे. श्रीलंकेला एक दमदार फलंदाज सापडला आहे. त्या फलंदाजाचे नाव कामिंदू मेंडिस आहे.

ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि बांगलादेशमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर आता २५ वर्षीय फलंदाज कामिंडू मेंडिसने न्यूझीलंडला दम दाखवला आहे.

श्रीलंकेचा संघ जेव्हा किवी संघाविरुद्ध संघर्ष करत होता, तेव्हा कामिंडू मेंडिसने अप्रतिम फलंदाजी करत संघाला सावरले. सोबतच एक मोठा विक्रमही रचला.

श्रीलंकेची प्रथम फलंदाजी

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा निर्णय चुकीचा ठरल्याचे दिसत होते, कारण त्यांचे ४ विकेट अवघ्या १०६ धावांवर गेले होते.

पण नंतर फलंदाजीला आलेल्या कामिंदू मेंडिसने एक बाजू लावून धरली आणि संघाला दोनशेच्या पुढे नेले. त्याने १७३ चेंडूत ११ चौकारांसह ११४ धावांची उत्कृष्ट खेळी खेळली.

कामिंदू मेंडिसने २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले. त्याने सलग कसोटी सामन्यांमध्ये पन्नास धावा करण्याचा विक्रमही केला आहे.

११ डावांमध्ये त्याने ८ वेळा ५० प्लस धावा

कामिंडूने २०२२ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पणात ६१ धावांची इनिंग खेळली होती. यानंतर, त्याने त्याच वर्षी बांगलादेशविरुद्धच्या दोन कसोटीत १०२, १६४, ९२* आणि ९ धावा केल्या.

यानंतर इंग्लंडविरुद्धच्या तिन्ही सामन्यांमध्ये प्रत्येकी एक अर्धशतकी खेळी खेळली. आता न्यूझीलंडविरुद्धही शतक झळकावून त्याने महान फलंदाज सुनील गावस्कर यांच्यासह अनेक दिग्गजांना मागे टाकले आहे.

कामिंडू मेंडिसने पदार्पणापासूनच सलग ७ सामन्यांमध्ये ५०+ धावा केल्या आहेत. सुनील गावसकर, वेस्ट इंडिजचे बेसिल बुचर, पाकिस्तानचे सईद अहमद आणि न्यूझीलंडचे बर्ट सटक्लिफ यांनी कसोटीत ६ वेळा हा पराक्रम केला होता.

कसोटीत ८०० धावा पूर्ण केल्या

कमिंडू मेंडिसने न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावून ८०० कसोटी धावांचा टप्पा ओलांडला आहे. या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला फक्त ७ कसोटी सामने लागले. कामिंदूच्या नावावर आतापर्यंत ४ शतके आहेत.

Whats_app_banner
विभाग