इंग्लंडचा महान फलंदाज जो रूट याने कसोटी क्रिकेटमधील विक्रम मोडीत काढले आहेत. आता त्याने वेलिंग्टन येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटीत शतक झळकावले आहे. दुसऱ्या डावात १०६ धावा करत त्याने कसोटी सामन्यात सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत राहुल द्रविडची बरोबरी केली आहे.
जो रूटच्या कसोटी कारकिर्दीतील हे ३६ वे शतक आणि २०२४ मधील सहावे शतक होते. रुटची ही खेळी मालिकेतील दुसऱ्या कसोटीतही मॅचविनिंग ठरली आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत जो रूट आता पाचव्या क्रमांकावर आला आहे. या यादीत फक्त सचिन तेंडुलकर (५१), जॅक कॅलिस (४५), रिकी पाँटिंग (४१) आणि कुमार संगकारा (३८) हेच त्याच्या पुढे आहेत.
रूटचे हे शतक खास अंदाजात पूर्ण केले. कारण ९८ धावांवर खेळत असताना त्याने मोठी जोखीम पत्करून रिव्हर्स स्कूप शॉट खेळला. सुदैवाने चेंडू बॅटला लागला आणि विकेटकीपरच्या मागे गेला. अशा प्रकारे त्याने चौकार मारत आपले शतक पूर्ण केले.
या कसोटी सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव २८०धावांवर आटोपला, तर प्रत्युत्तरात न्यूझीलंडला केवळ १२५ धावा करता आल्या. सामना पूर्णपणे इंग्लंडच्या बाजूने होता आणि फलंदाजांनी बाकीचे काम केले. दुसऱ्या डावात बेन डकेट आणि जेकब बेथेल यांनी अनुक्रमे ९२ आणि ९६ धावांची खेळी केली.
जो रूटच्या शतकी खेळीने बाकीचे काम केले. ५८३ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला किवी संघ २५९ धावांत सर्वबाद झाला. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक ३ बळी घेतले. हा सामना जिंकल्याने इंग्लंडने आता तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे.
संबंधित बातम्या