इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूट याने इतिहासाच्या पानात आपले नाव सोनेरी अक्षरात नोंदवले आहे. जो रूट इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने आज (९ ऑक्टोर) इंग्लंडचा माजी दिग्गज कर्णधार ॲलिस्टर कुक याला मागे टाकले.
मुलतानमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जात असलेल्या कसोटीत रूटने हा पराक्रम केला.
इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी धावा करण्याचा मान पटकावणारा जो रूट एकंदरीत सर्वाधिक धावा करणारा पाचवा फलंदाज ठरला. टॉप-५ च्या या यादीत भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकर (१५९२१ धावा) पहिल्या क्रमांकावर आहे.
त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग (१३३७८ धावा) दुसऱ्या स्थानावर, दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू जॅक कॅलिस (१३२८९ धावा) तिसऱ्या स्थानावर आणि भारताचा माजी फलंदाज राहुल द्रविड (१३२८८ धावा) चौथ्या स्थानावर आहे.
सचिन तेंडुलकर (भारत)- १५,९२१
रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) - १३,३७८
जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) - १३, २८९
राहुल द्रविड (भारत)- १३,२८८
इंग्लंडचा माजी कर्णधार ॲलिस्टर कुकने आपल्या करिअरमध्ये १६१ कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या २९१ डावात फलंदाजी करताना त्याने ४५.३५ च्या सरासरीने १२४७२ धावा केल्या. तर रुटने २६८ डावांत हा आकडा पार केला. म्हणजे रुटने कमी डावात फलंदाजी करून कुकपेक्षा जास्त धावा केल्या.
रूटने डिसेंबर २०१२ मध्ये भारताविरुद्ध नागपुरात खेळल्या गेलेल्या कसोटीतून या फॉरमॅटमध्ये पदार्पण केले. आत्तापर्यंत त्याने १४६ कसोटी सामने खेळले आहेत आणि मुलतानमध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याची १४७ वी कसोटी खेळत आहे. कुकचा विक्रम मोडेपर्यंत जो रूट नाबाद असून शतकाच्या जवळ आहे.
त्यामुळे मुलतानमध्ये खेळला जाणारा सामना वगळून आम्ही तुम्हाला रूटच्या कसोटी कारकिर्दीबद्दल सांगणार आहोत. आतापर्यंत रूटने १४६ कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या २६७ डावांमध्ये फलंदाजी करताना त्याने ५०.६२ च्या सरासरीने १२४०२ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याच्या बॅटमधून ३४ शतके आणि ६४ अर्धशतके झाली आहेत.
संबंधित बातम्या