इंग्लंडचा महान फलंदाज जो रूट सध्या तुफान फॉर्मात आहे. त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडत आहे. मुलतान कसोटीतही हेच पाहायला मिळाले. मुलतान येथे पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात कसोटी सामना खेळला जात आहे. सामन्याचा आज (९ ऑक्टोबर) तिसरा दिवस असून जो रूटने शानदार शतक ठोकले आहे. रूटचे हे ३५ वे कसोटी शतक आहे.
या शतकासह जो रूटने एक ऐतिहासिक विक्रम केला आहे. रुट आता इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. ॲलिस्टर कूकने आपल्या कसोटी कारकिर्दीत १२,४७२ धावा केल्या होत्या, पण रुट आता त्याच्या पुढे गेला आहे.
जो रूटचे पुढील लक्ष्य आता भारताचा महान फलंदाज राहुल द्रविड आहे, ज्याने १६४ कसोटी सामन्यांमध्ये १३,२८८ धावा केल्या आहेत.
रूट अजूनही द्रविडपासून दूर आहे पण क्रिकेटच्या प्रदीर्घ फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो पाचव्या स्थानावर आला आहे.
या वर्षात आतापर्यंत खेळलेल्या २१ कसोटी डावांमध्ये रूटने ५६ पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आहेत. या २१ डावांमध्ये त्याने ५ शतके आणि ४ अर्धशतके केली आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम 'क्रिकेटचा देव' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने २०० कसोटी सामन्यांमध्ये १५,९२१ धावा केल्या होत्या. दुसरीकडे, जो रूटने अद्याप १३ हजार धावाही पूर्ण केल्या नाहीत.
जर रूटला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनायचे असेल तर त्याला ३,३०० पेक्षा जास्त धावा कराव्या लागतील. रूटने दरवर्षी हजाराहून अधिक धावा केल्या तरी सचिनला मागे सोडण्यासाठी त्याला किमान ३ वर्षे कसोटी क्रिकेट खेळावे लागेल.
दुसरीकडे, शतकांबद्दल बोलायचे झाले तर, सध्या सचिनच्या जवळ कोणीही नाही. सचिनने आपल्या कसोटी कारकिर्दीत ५१ शतके झळकावली होती, मात्र रुटला आतापर्यंत केवळ ३४ शतके झळकावता आली आहेत. पण धावांच्या बाबतीत रुटचा फॉर्म असाच कायम राहिला तर तो सचिन तेंडुलकरला नक्कीच मागे सोडेल.
सचिन तेंडुलकर (भारत)- १५,९२१
रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) - १३,३७८
जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) - १३, २८९
राहुल द्रविड (भारत)- १३,२८८